मुंबईत दहीहंडी साजरी करणार्यांवर चार ठिकाणी गुन्हे दाखल, मनसे, भाजपाच्या अडचणी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 17:45 IST2021-08-31T17:02:07+5:302021-08-31T17:45:44+5:30
Dahihandi in Mumbai : मुंबईमध्ये दहीहंडी साजरा करणार्यांवर चार ठिकाणी गुन्हे दाखल

मुंबईत दहीहंडी साजरी करणार्यांवर चार ठिकाणी गुन्हे दाखल, मनसे, भाजपाच्या अडचणी वाढणार?
कोरोनाचे निर्बंध झुगारून दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी भाजपा तसेच मनसेची काही गोविंदा पथके सज्ज झाली होती. तिसऱ्या लाटेची भीती असून कोरोनाच्या निर्बंधांमुळे सार्वजनिक उत्सवाना राज्य शासनाने बंदी घातली आहे. मात्र कोरोनाचे निर्बंध झुगारून दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी भाजपा आणि मनसेची काही गोविंदा पथके सज्ज झाली. त्यामुळे पोलिसांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवून दहीहंडी साजरी करणाऱ्यांवर मुंबईत चार ठिकाणी गुन्हे दाखल केले आहे. कस्तुरबा मार्ग, घाटकोपर, वरळी, काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच इतर ठिकाणी सुद्धा गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून याप्रकरणी ज्यांनी दहीहंडी साजरी केली आहे, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. देशभरात जन्माष्टमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मात्र, गतवर्षाप्रमाणे यंदाच्याही वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन केलेले आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपने तीव्र विरोध केला असून, नियम झुगारून काही ठिकाणी दहीहंडी साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सनातन धर्म लाखो वर्षांपासूनचा आहे. आम्ही परंपरा खंडित होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपने घेतली आहे.