'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 17:55 IST2026-04-04T17:53:39+5:302026-04-04T17:55:23+5:30
आग्रा येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पतीची हत्या करणारी पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राला अटक केली आहे.

AI फोटो
आग्रा येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पतीची हत्या करणारी पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राला अटक केली आहे. अनैतिक संबंधांतून ही घटना घडली असून, लोकेंद्र नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी लोकेंद्रला दारू पाजण्यात आली आणि त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. ओळख पटू नये यासाठी आरोपींनी मृतदेहावर दारू आणि पेट्रोल ओतून तो जाळण्याचाही प्रयत्न केला.
हे प्रकरण सैयां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. बुधवारी एका शेतात लोकेंद्रचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पाच पथकं तयार करून तपास सुरू केला. मृतदेहाजवळ सापडलेली दारूची रिकामी बाटली आणि कागदाचा एक तुकडा या पुराव्यांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांनी दारूच्या बाटलीवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करून संबंधित दुकानाचा पत्ता शोधला आणि तिथलं सीसीटीव्ही फुटेज मिळवलं. फुटेजमध्ये महेश आणि धर्मवीर दारू खरेदी करताना दिसले. तसेच, सापडलेल्या कागदाच्या तुकड्यावरून एका फळविक्रेत्याचा शोध लागला. त्याने सांगितले की तो त्याच कागदात फळं द्यायचा. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं.
चौकशी दरम्यान महेशने धक्कादायक खुलासा केला की, त्याचे मृताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. लोकेंद्रला या प्रकरणाची कुणकुण लागली होती आणि त्याने याला विरोधही केला होता. विरोध करूनही त्यांचे संबंध सुरूच राहिले. जेव्हा लोकेंद्रने ही बाब नातेवाईक आणि शेजाऱ्यांना सांगितली, तेव्हा त्याच्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून हत्येचा कट रचला.
जेव्हा लोकेंद्र घराबाहेर पडला, तेव्हा पत्नीने प्रियकराला बोलावून घेतले. रस्त्यात त्याला अडवून तिघेही त्याला शेतात घेऊन गेले. तिथे आधी सर्व दारू प्यायले आणि नंतर त्याची गळा आवळून हत्या केली. आरोपींनी ‘दृश्यम’ चित्रपटातून प्रेरणा घेऊन पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पूर्णपणे यशस्वी झाले नाहीत. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.