अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’ खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 05:38 IST2025-11-24T05:37:25+5:302025-11-24T05:38:02+5:30
घराच्या शिफ्टिंगदरम्यान सापडलेल्या कागदपत्राने गौरीला धक्का

अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’ खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
मुंबई : डॉ. गौरी पालवे हिचा विवाह वडिलांनी थाटात अनंतसोबत लावून दिला. मात्र, काही दिवसांतच अनंतने छोट्या छोट्या कारणातून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यात, घराच्या शिफ्टिंगदरम्यान हाती लागलेल्या कागदपत्राने तिच्या पायाखालची जमीन सरकली. २०२१ रोजीचे लातूरच्या एका गर्भवती महिलेचे संमतीपत्र आणि जाहीरनामा होता. त्यात, महिलेच्या पतीचे नाव अनंत गर्जे असे नमूद होते. त्यामुळे अनंतच्या अनैतिक संबंधाचा संशय खरा ठरला. तेव्हापासून ती मानसिक तणावात होती. याबाबत अनंतकडे जाब विचारताच त्याने तिला आत्महत्या करून चिठीत गौरीचे नाव लिहिण्याची धमकी दिल्याने ती आणखी खचल्याचे गौरीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
गौरीचे वडील अशोक पालवे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घराच्या शिफ्टिंगदरम्यान गौरीच्या हाती लागलेली कागदपत्र तिने व्हॉट्सॲपवर पाठविली. त्यात, एका गर्भवती महिलेच्या पतीचे नाव अनंत गर्जे असे नमूद होते. त्या कागदपत्रावरून अनंत याचे संबंधित महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगत तिने रडण्यास सुरुवात केली. वडिलांनी तिच्याकडे येत असल्याचे सांगताच तिने त्यांना नकार दिला. अनंतला आवडणार नाही म्हणत तिने येण्यास नकार दिला.
पतीची आत्महत्येची धमकी
३ ऑक्टोबर रोजी अनंतच्या वाढदिवसानिमित्ताने आई - वडिलांनी काहीही न कळवता तिचे घर गाठले. तेव्हा, गौरी हिच्या चेहऱ्यावर व गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले. आई - वडिलांना पाहून ती घाबरली. तुम्ही जा, असे ती सांगत होती. अनंतकडे या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर त्याने याबाबत तुला काय करायचे ते कर, मी कोणाला घाबरत नाही, याबाबत कोणाला सांगितले तर, तुझे नाव चिठीत लिहून आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्याचे तिने आई - वडिलांना सांगितले. त्याने मारहाण केल्याचेही तिने सांगितले.
दुसऱ्या लग्नाची धमकी
गर्जेचा भाऊ आणि बहिणीला त्यांच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती होती. तुझे अनंतसोबत जमले नाही तर मी माझ्या भावाचे दुसरे लग्न लावेन, अशी धमकी नणंद शीतल आंधळे देत असल्याचेही गाैरीने सांगितले.
योग्य तपास व्हावा : पंकजा मुंडे
डॉ. गौरी यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, शनिवारी संध्याकाळी ६.३० ते ६.४५ वाजण्याच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठीही खूप धक्कादायक होती.
मी तिच्या सहकारी डॉक्टर मैत्रिणींशी बोलले, त्यांचे म्हणणे आहे, ती खूप साधी होती, पण खूप स्ट्राँग होती, आत्महत्या करेल अशी ती मुलगी नव्हती, पंकजा मुंडे यांनी पोलिसांना फोन करून माझा पीए असला तरी योग्य कारवाई करा, असे म्हणणे अपेक्षित होते. - अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या