दुसऱ्या विवाहास नकार दिल्याने टिकटॉकरची विष देऊन हत्या; मुलीने केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:27 IST2025-07-26T19:25:16+5:302025-07-26T19:27:19+5:30
पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर असलेल्या महिलांवरील हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

दुसऱ्या विवाहास नकार दिल्याने टिकटॉकरची विष देऊन हत्या; मुलीने केले गंभीर आरोप
Pakistan Crime: गेल्या काही महिन्यांपासून महिला सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसाठी पाकिस्तान नरक बनला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यातील बागो वाह भागात एका टिकटॉक कंटेंट क्रिएटरचा मृतदेह तिच्याच घरात संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. प्रसिद्ध पाकिस्तानी टिकटॉक स्टार सुमिरा राजपूत हिला विवाह करण्यास नकार देणे खूप महागात पडले. विवाहास नकार दिल्यामुळे तिला विष देण्यात आला असा आरोप तिच्याच मुलीने केला.
मृत सुमिरा राजपूतच्या १५ वर्षांच्या मुलीने सांगितले की, तिला विवाह करण्यास भाग पाडणाऱ्या लोकांनी विष दिले. सुमिरा राजपूतच्या मुलीने दावा केला की, संशयितांनी सुमिराला विषारी गोळ्या दिल्या, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. सुमिराची मुलगी देखील कंटेंट क्रिएटर आहे आणि तिचे टिकटॉकवर ५८,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत. या सगळ्या प्रकारामुळे मुलीला जबर धक्का बसला आहे.
सुमिराच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर परसताच लोकांनी संताप व्यक्त केला. सुमिरा टिकटॉकवर बरीच लोकप्रिय होती आणि तिच्या काही पोस्टना दहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते. सुमिराच्या मुलीने केलेल्या दाव्यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना अटक करण्यात आली आहे पण सुमिराच्या मृत्यूमागील कारणे अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणात आणखी लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु असल्याचे म्हटलं.
सुमिराची हत्या खरोखरच विष देऊन झाली आहे की सत्य काही वेगळे आहे याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्ध होणे देखील महिलांसाठी घातक ठरत आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात, १७ वर्षीय सना युसूफ नावाच्या आणखी एका टिकटोकरची पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील तिच्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सनाच्या हत्येप्रकरणी २२ वर्षीय उमर हयातला अटक करण्यात आली होती. पाकिस्तानच्या काही भागात यापूर्वीही अशाच घटना घडल्याचे समोर आलं आहे.