Etawah News: हुंड्यात मिळालेल्या कारनं पुजेवेळी ४ जणांना उडवलं, वराच्या आत्येचा मृत्यू; आनंदावर विरजण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 15:26 IST2022-11-02T15:25:57+5:302022-11-02T15:26:57+5:30
उत्तर प्रदेशातील इटावा येथे शुभ मुहूर्तावर एक दुर्दैवी अपघात घडला, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. एका कुटुंबात आयोजित तिलक सोहळ्यात कार अपघातामुळे आनंदाचं रुपांतर शोकात झालं.

Etawah News: हुंड्यात मिळालेल्या कारनं पुजेवेळी ४ जणांना उडवलं, वराच्या आत्येचा मृत्यू; आनंदावर विरजण
इटावा:
उत्तर प्रदेशातील इटावा येथे शुभ मुहूर्तावर एक दुर्दैवी अपघात घडला, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. एका कुटुंबात आयोजित तिलक सोहळ्यात कार अपघातामुळे आनंदाचं रुपांतर शोकात झालं. पीएसीमध्ये काम करणाऱ्या हवालदाराला तिलक समारंभात कार मिळाली होती. पूजा आणि नारळ फोडण्याच्या समारंभात वराचा कारवरील ताबा सुटला. कारनं ४ जणांना उडवलं. यात वराच्या मावशीचा मृत्यू झाला.
इटावा येथील इकदिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीएसीमध्ये तैनात असलेल्या जवानाचा तिलक सोहळा सुरू होता. कुटुंबीयांनी वधूच्या वतीने विधी पार पाडले. त्याचवेळी तिलक समारंभात हुंडा म्हणून मिळालेल्या नवीन कारच्या पूजेच्या वेळी वराने नारळ फोडण्यासाठी कार चालू करुन पुढे आणली. त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटून सोहळ्यात उपस्थित चार जणांना उडवलं.
हा अपघात फतेहपूर पीएसीमध्ये तैनात कॉन्स्टेबल अतुल कुमार यांच्या हातून घडला. त्यांचंच लग्न होतं. उपचारादरम्यान कॉन्स्टेबलची आत्या सरला देवी यांचा मृत्यू झाला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे ऐन आनंदाच्या क्षणी शोककळा पसरली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची माहिती देताना इटावा एसएसपी जयप्रकाश सिंह यांनी कारचा अपघात झाला ज्यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या घटनेबाबत अद्याप कोणाकडूनही तक्रार करण्यात आलेली नाही. तक्रार येताच कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.