‘भूतबाधा’ पळविण्यासाठी पोटच्या मुलीलाच संपविले; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 06:14 IST2022-08-08T06:13:42+5:302022-08-08T06:14:14+5:30
गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेला सिद्धार्थ व रंजना लहान मुलगी अनक्षी आणि इतर मुलींसह टाकळघाटच्या दरगाहला गेले होते.

‘भूतबाधा’ पळविण्यासाठी पोटच्या मुलीलाच संपविले; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
नागपूर : मुलीच्या शरीरात झालेली कथित भूतबाधा पळविण्यासाठी जन्मदात्या आई-वडिलांनीच पाच वर्षांच्या चिमुकलीला बेदम मारहाण करून मारल्याची संतापजनक घटना प्रतापनगर परिसरातील कामगार कॉलनीत शनिवारी दुपारी घडली.
अनक्षी सिद्धार्थ चिमणे, असे मृत बालिकेचे नाव आहे, तर वडील सिद्धार्थ प्रल्हाद चिमणे (४५), आई रंजना सिद्धार्थ चिमणे (४१, दोघे रा. कामगारनगर) आणि मावशी प्रिया अमर बन्सोड (३५, भिवापूर), अशी आरोपींची नावे आहेत. वडील सिद्धार्थ एक यू-ट्यूब चॅनल चालवितात. आरोपींनी मुलीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओही तयार केला होता. यामुळे आरोपींच्या क्रूर कृत्याच्या पुरावा मिळाला आहे.
गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेला सिद्धार्थ व रंजना लहान मुलगी अनक्षी आणि इतर मुलींसह टाकळघाटच्या दरगाहला गेले होते. तेथून परतल्यानंतर अनक्षीने भोजन करणे बंद केले. दाम्पत्याला मुलीच्या वागणुकीत बदल झाल्याची शंका आली. त्यांनी मुलीला भूतबाधा झाल्याचा समज करून घेत तिला काळ्या जादूने बरे करण्याचे ठरविले. शुक्रवारी कथित झाडफुक केल्यानंतर आरोपींनी अनक्षीला चामड्याच्या बेल्टने बेदम मारहाण केली. त्यात ती बेशुद्ध झाली. शनिवारी तिला उमरेडच्या दरगाहमध्ये घेऊन गेले. परतल्यानंतर मुलीच्या शरीराची हालचाल बंद झाली होती.