संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 19:26 IST2025-11-23T19:25:38+5:302025-11-23T19:26:02+5:30
पत्नीने सोयाबीनची भाजी बनवल्याच्या क्षुल्लक कारणावरून पती-पत्नी दोघांमध्ये जोरदार वाद झाला अन्..

संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातून एक सनसनाटी आणि हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ पत्नीने सोयाबीनची भाजी बनवल्याच्या क्षुल्लक कारणावरून तिचा जीव घेतला. डोक्यात विटेने गंभीर वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आणि नंतर आरोपी पतीनेच पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
चिल्हिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोकनार गावात शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ३२ वर्षीय हाजरा हिचा मृतदेह गावाबाहेरील एका झोपडीत सापडला. हाजरा आणि तिचा पती कमरुद्दीन याच झोपडीत राहात होते. हाजराच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या, ज्यामुळे तिचा खून वजनदार वस्तूने हल्ला करून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता.
पतीनेच दिली पोलिसांना खोटी माहिती
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती कमरुद्दीन याने गावकरी आणि पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून एका अज्ञात व्यक्तीने पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कमरुद्दीनकडे चौकशी करत असताना, तो सातत्याने एकच गोष्ट सांगत होता की, "मी चिल्हिया बाजारात गेलो होतो, परत येऊन पाहिलं तर पत्नीची हत्या झाली होती." कमरुद्दीनच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मात्र, पोलिसांना कमरुद्दीनच्या बोलण्यात विसंगती आढळली.
सोयाबीनवरून झाले भयंकर भांडण!
पोलिसांना संशय आल्याने मृत हाजराचा पती कमरुद्दीन याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने काहीही कबूल केले नाही, पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर तो रडकुंडीला आला आणि त्याने गुन्हा कबूल केला.
एएसपी प्रशांत कुमार प्रसाद यांनी रविवारी या हत्याकांडाचा खुलासा केला. आरोपी कमरुद्दीनच्या माहितीनुसार, रात्री आठ वाजता तो घरी आला. त्याने पत्नी हाजराला "आज जेवण काय बनवलं आहे?" असे विचारले. तेव्हा हाजराने सोयाबीनची भाजी बनवल्याचे सांगितले. यामुळे कमरुद्दीनला राग अनावर झाला. दोघांमध्ये मोठे भांडण झाले आणि रागाच्या भरात कमरुद्दीनने जवळ पडलेल्या दोन विटांनी हाजराच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून तिचा जीव घेतला.
आरोपीच्या माहितीवरून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेल्या दोन विटा आणि रक्ताने माखलेली त्याची जीन्स पॅन्ट जप्त केली आहे. पत्नीच्या हत्येचा आरोपी कमरुद्दीन याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.