...अन्यथा डी. मोहन पुन्हा निसटला असता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 00:07 IST2020-11-19T00:07:08+5:302020-11-19T00:07:46+5:30
Crime News: राकेश पाटील हत्या प्रकरण : पनवेलला पोलीस वेळेवर पोहोचल्याने केली अटक

...अन्यथा डी. मोहन पुन्हा निसटला असता
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : राकेश पाटील यांच्या हत्येनंतर फरार झालेला मुख्य आरोपी हा नागपूरहून मुंबईला परत येत होता. या प्रकरणात जास्त दिवस फरार राहणे शक्य नसल्यानेच तो मुंबईत पोलिसांच्या स्वाधीन होण्याच्या इराद्यानेच येत असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, पनवेल स्थानकात उतरल्यावर डी. मोहन नेमका कोठे तावडीत सापडेल, याची जाणीव पोलिसांना नव्हती. मात्र, बस डेपोवर पोलीस वेळेवर पोहोचल्यामुळे तो जाळ्यात अडकला. पाच मिनिटे जरी विलंब झाला असता, तर डी. मोहन आणि त्याचे दोन्ही साथीदार पुन्हा फरार होण्याची शक्यता होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
२८ ऑक्टोबरला राकेश यांची हत्या झाल्यानंतर लागलीच डी. मोहन आणि त्याचे काही साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, काही आरोपींना मुरबाडजवळ ताब्यात घेण्यात आले. डी. मोहन आणि त्याच्या सोबतचे दोन प्रमुख आरोपी हे पोलिसांना गुंगारा देत महाराष्ट्रबाहेर फिरत होते. पुन्हा ते जळगावहून नागपूरला पळून गेले. शहरातील वातावरण तंग असल्याची कल्पना या फरार आरोपींना होती. आज ना उद्या आपण पोलिसांच्या तावडीत सापडणार हे माहिती होते. त्यामुळे ते आपल्या जवळच्या सहका-यांशी संपर्क ठेवून होते.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार हे तिघेही मुंबईत येऊन पोलिसांना शरण येण्याच्या तयारीत असावेत, म्हणून ते पुन्हा मुंबईत आल्याची शक्यता वर्तवली जात होती.
एन्काउंटरची त्याला होती भीती
पोलिसांना डी. मोहन ज्या ठिकाणी येईल, अशी माहिती मिळाली होती, त्या ठिकाणी तो वेळेत पोहोचलाच नाही. त्याने पनवेलला आल्यावर आपला मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याच्याच सहका-याने त्याचे एन्काउंटर होईल, अशी भीती मनात घातली असावी. या भीतीने आपला मार्ग बदलण्यासाठी पनवेल बस डेपोत गेला. त्या ठिकाणी बस पकडून तो पुन्हा फरार होण्याच्या मार्गावर होता. मात्र, पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरल्याने तो तावडीत सापडला.