ऑनलाईन मोबाईल मागवला; डिलिव्हरी बॉयची हत्या करुन तुकडे कालव्यात फेकले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 18:22 IST2024-09-30T18:18:12+5:302024-09-30T18:22:54+5:30
फुकट मोबाईल घेण्यासाठी दोन तरुणांनी आखली योजना.

ऑनलाईन मोबाईल मागवला; डिलिव्हरी बॉयची हत्या करुन तुकडे कालव्यात फेकले...
UP Crime : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयची निर्घृण हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी हत्येचे कारण सांगितल्यावर पोलीसही चक्रावून गेले. मोबाईलसाठी या दोघांनी डिलिव्हरी बॉयल मारल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपींनी सांगितले की, त्यांनी ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरुन दोन मोबाईल फोन मागवले होते. मोबाईल घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे डिलिव्हरी बॉयने त्यांना मोबाईल देण्यास नकार दिला. यानंतर त्या दोघांनी त्या डिलिव्हरी बॉयची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून माटी परिसरातील इंदिरा कालव्यात फेकून दिले. हत्येची ही खळबळजनक घटना राजधानी लखनऊमधील चिन्हाट पोलीस स्टेशन परिसरात घडली.
दोन्ही आरोपींच्या सांगण्यावरून पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापपर्यंत मृतदेहाचा पत्ता लागलेला नाही. पोलीस आणि एसडीआरएफचे गोताखोर इंदिरा कालव्यात मृतदेहाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, हत्येतील आरोपींची नावे गजानंद आणि आकाश अशी आहेत. दोघांना अटक करून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, मृतदेहाचे तुकडे करण्याचा दावा चुकीचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृतदेह पोत्यात भरून कालव्यात टाकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.