टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:10 IST2025-11-21T12:08:19+5:302025-11-21T12:10:44+5:30
तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ विवाहित महिलांनाच आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
कर्नाटकच्या चिकबळ्ळापूर येथे एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ विवाहित महिलांनाच आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तीन महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पीडित महिलांनी चिंतामणी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. चिंतामणी नगर येथील रहिवासी असलेल्या सी.एम. गिरीश ऊर्फ साईसुदीप नावाच्या या तरुणाने ही फसवणूक केली आहे.
असा चालायचा 'टॉर्चर'चा खेळ
आरोपी साईसुदीप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर विवाहित महिलांना 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठवत असे. महिलांनी रिक्वेस्ट स्वीकारल्यावर तो त्यांच्याशी मैत्री करायचा. या मैत्रीचे रूपांतर त्याने हळूहळू प्रेमात करायचा आणि त्यांना दुसरे लग्न करण्याचे खोटे आमिष दाखवून भुलवायचा.
यादरम्यान, आरोपीने महिलांचे लैंगिक शोषण केले. याच शोषणादरम्यान आरोपीने महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केले. हेच व्हिडीओ दाखवून त्याने महिलांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. या भयानक टॉर्चरला कंटाळून अखेर पीडित महिलांनी सामाजिक कार्यकर्ता कृष्णमूर्ती यांच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
अनेक महिलांना फसवलं!
पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी साईसुदीप हा केवळ या तीनच महिलांच्या संपर्कात नव्हता, तर त्याने नंदगुडी, बंगळूरू, चिकबळ्ळापूर आणि बांगरपेटसह विविध ठिकाणच्या ५ पेक्षा जास्त महिलांशी अशाच प्रकारे फसवणूक करून लाखो रुपये लुटल्याचे उघड झाले आहे. या गंभीर गुन्ह्यांची नोंद घेत पोलिसांनी आरोपी साईसुदीपचा शोध सुरू केला आहे. सध्या पोलीस विविध ठिकाणी छापेमारी करत आहेत.
सायबर फसवणुकीपासून सावध राहा!
सध्याच्या काळात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया हे फसवणूक करणाऱ्यांचे प्रमुख लक्ष्य बनले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी नागरिकांना, विशेषत: महिलांना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी नीट तपासून घेण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला आहे.