एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:37 IST2025-09-09T18:34:04+5:302025-09-09T18:37:04+5:30
उत्तराखंडच्या रुरकी येथील कलियरमध्ये एका हत्येच्या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. या धक्कादायक हत्येच्या घटनेत दोन दिव्यांग व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
उत्तराखंडच्या रुरकी येथील कलियरमध्ये एका हत्येच्या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. या धक्कादायक हत्येच्या घटनेत दोन दिव्यांग व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सामील असलेल्या एकाचा एक पाय निकामी आहे, तर दुसरा अंध आहे. या दोघांनी मिळून एका हॉटेल चालकाच्या २० वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
हॉटेल मालकाच्या मुलाची हत्या
मृतकाचे नाव अन्वर असून, तो शनिवारी अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर, रविवारी कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. अन्वरचे अपहरण झाल्याची आणि अपहरणकर्त्यांनी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, अन्वरची हत्या करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार नसून, सामान्य कुटुंबातील तरुण आहेत. यापैकी एक तरुण पायाने दिव्यांग आहे, तर दुसरा दृष्टिहीन आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आले सत्य
पोलिसांनी सांगितले की, अन्वरचे वडील नसीर यांनी रविवारी मुलाच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि स्थानिक लोकांकडून माहिती घेतली. तेव्हा असे समोर आले की, दोन तरुणांनी अन्वरला चहा पिण्यासाठी बोलावले आणि नंतर त्याचे अपहरण केले.
आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले की, अन्वरला बोलावल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर सायंकाळी दोघांनी मिळून मृतदेह पोत्यात भरला आणि दुचाकीवरून गंगनहरकडे नेला. तिथे त्यांनी मृतदेह कालव्यात फेकून दिला.
आर्थिक अडचणीने गुन्हेगारीकडे ढकलले
पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडून त्यांची चौकशी केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. एक आरोपी फक्त पाचवीपर्यंत शिकलेला आहे, तर दुसरा नववीतच शाळा सोडून बसला आहे. या दोघांकडेही कोणताही निश्चित रोजगार नव्हता. आर्थिक अडचणी आणि पैशांच्या हव्यासाने त्यांना या गुन्ह्याकडे ढकलले. पोलिसांनी पुढे सांगितले की, मृत अन्वरची या आरोपींशी ओळख होती. त्यातील एक आरोपी कधीकाळी अन्वरच्या घरी भाड्याने राहत होता. याच ओळखीचा फायदा घेत, त्यांनी अन्वरच्या अपहरणाचा कट रचला आणि नंतर त्याची हत्या केली.
सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन तुरुंगात पाठवले आहे. गंगनहरमधून मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.