कुंडीत चावी ठेवल्याने चोरी करणे झाले सोपे : एका दुकानदाराने केली दुसऱ्या दुकानात चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 16:37 IST2019-07-24T16:35:08+5:302019-07-24T16:37:00+5:30
धनकवडीत अशाच प्रकारे दरवाजाजवळील कुंडीत चावी ठेवणे महागात पडले़..

कुंडीत चावी ठेवल्याने चोरी करणे झाले सोपे : एका दुकानदाराने केली दुसऱ्या दुकानात चोरी
पुणे : घरातील लोकांना अथवा कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना चावी देण्यापेक्षा दरवाजाजवळ एखाद्या वस्तूखाली चावी ठेवण्याची पद्धत अजूनही वापरली जाते़. त्यात सोय असली तर त्यातून चोरीचा धोका असतो़. धनकवडीत अशाच प्रकारे दरवाजाजवळील कुंडीत चावी ठेवणे महागात पडले़. के़के़ मार्केटमधील एका दुकानदाराने बाहेर ठेवलेली चावी घेऊन दुसऱ्याचे कार्यालय उघडले व आतील ९० हजार रुपयांचे सीपीयु, मॉनिटर, मोबाईल, रोकड चोरुन नेले़.सहकारनगर पोलिसांनी या दुकानदाराला अटक केली आहे़.
आकाश प्रल्हाद कदम (रा़ ओम अपार्टमेंट, धनकवडी) असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी व्यंकटराव दत्तात्रय कराड (वय २६, रा़ केशव कॉम्प्लेक्स, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे़. व्यंकटराव कराड यांचे केके मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावर विन लोन कन्सल्टन्सी नावाचे कार्यालय आहे़. त्याच ठिकाणी आकाश कदम याचे दुकान आहे़. कराड यांच्याकडे अनेक कर्मचारी येत असल्याने ते कार्यालयाची चावी कुंडीत ठेवत असत़, आकाश कदम याने ते पाहिले होते़. २२ जुलैच्या रात्री कार्यालय बंद झाल्यानंतर कदम याने कुंडीतील चावी घेऊन कार्यालय उघडले़. आतील २ कॉम्प्युटर, मॉनिटर, ३ मोबाईल, रोख रक्कम चोरुन नेली़ दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालय उघडल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला़. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली़. एकंदर परिस्थिती व सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर त्यांना कदम याच्यावर संशय आला़. त्यांनी कदम याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली़. पोलिसांनी त्याच्या दुकानातून चोरीचा सर्व माल जप्त केला आहे़.