एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 09:40 IST2025-08-17T09:30:26+5:302025-08-17T09:40:05+5:30
एका आईने आपल्या दोन लहान मुलींची हत्या केली. हे क्रूर कृत्य केल्यानंतर तिने स्वतः आपल्या जावेला याबद्दल सांगितले.

एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
मध्यप्रदेशातील उज्जैनपासून ६५ किलोमीटर दूर असलेल्या महिदपूर तहसीलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आईने आपल्या दोन लहान मुलींची गळा दाबून हत्या केली. हे क्रूर कृत्य केल्यानंतर तिने स्वतः आपल्या जावेला याबद्दल सांगितले. तिने आपल्या जावेला जाऊन सांगितले की, "मी माझ्या दोन मुलींना मारले आहे." यानंतर घाबरलेल्या जावेने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणाबद्दल माहिती देताना महिदपूरचे एसडीओपी सुनील वरकडे म्हणाले की, महिदपूर पोलीस ठाण्याच्या तुळसापुरा गावात दोन लहान मुलींच्या हत्येची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहोचल्यावर असे समजले की, अशोक बंजारा यांना तीन मुली होत्या. त्यांच्या पत्नी पूजाने ४ वर्षांच्या उमा आणि ८ महिन्यांच्या अनुष्का यांचा गळा दाबून खून केला. ज्यावेळी पूजाने हे कृत्य केले, त्यावेळी दोन्ही मुली घरात खेळत होत्या आणि त्यांची ७ वर्षांची मोठी बहीण व वडील अशोक घरी नव्हते.
तोंडातून रक्त आणि शरीरावर जखमा
दोन्ही मुलींना ठार मारल्यानंतर पूजा स्वतः आपल्या जावेकडे गेली आणि तिने या घटनेची माहिती दिली. त्यानंतर महिदपूर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. महिदपूर रुग्णालयाच्या डॉक्टर मैत्री मिश्रा यांनी सांगितले की, दोन्ही मुलींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. पण, जेव्हा त्यांचा उपचार सुरू करण्यात आले, तेव्हा त्या आधीच मृत झाल्याचे समजले. डॉक्टर मैत्री यांनी सांगितले की, एका मुलीच्या नाकातून रक्त येत होते, तर दुसऱ्या मुलीच्या शरीरावरही जखमा होत्या. दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
पूजा मानसिकरित्या आजारी
महिदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी एन. बी. एस. परिहार यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीत असे दिसून आले आहे की पूजा मानसिकरित्या आजारी आहे, म्हणूनच तिने एवढे मोठे पाऊल उचलले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, शवविच्छेदन अहवालाची वाट पाहिली जात आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. या संपूर्ण घटनेनंतर पूजाने आपल्या दोन्ही मुलींना मारल्यानंतर स्वतः आपल्या जावेला सांगितले की, तिने आपल्या ८ महिन्यांच्या अनुष्का आणि ४ वर्षांच्या उमा यांचा गळा दाबून जीव घेतला आहे, त्यानंतर जावेने पोलिसांत तक्रार दाखल केली.