पुण्यात झाडलोट करायला बाहेर आलेल्या आजी समोरच्या दृश्याने हादरल्या; रक्ताच्या थारोळ्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 09:56 IST2025-04-01T09:55:05+5:302025-04-01T09:56:23+5:30
Pune Crime: आदल्या रात्री घरासमोरील पलंगावर झोपलेल्या माणसाबाबत घडली धक्कादायक घटना

पुण्यात झाडलोट करायला बाहेर आलेल्या आजी समोरच्या दृश्याने हादरल्या; रक्ताच्या थारोळ्यात...
किरण शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क: झाडलोट करण्यासाठी आजी पहाटे पहाटे घराबाहेर पडली होती. मात्र समोरचे दृश्य पाहून आजीला दरदरून घाम फुटला. कारण घराशेजारीच राहणारा एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. कुणीतरी भला मोठा दगड त्याच्या डोक्यात घातला होता. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. खुनाचा हा प्रकार घडला लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
रवींद्र काशिनाथ काळभोर (वय ४५ रा. वडाळी वस्ती, रायवाडी रोड, टाक्याचा माळ, सिद्धनाथ मंदिराजवळ लोणी काळभोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रवींद्र काळभोर हे सोमवारी रात्री दहा वाजता घरासमोर पलंगावर झोपले होते. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास शेजारीच राहणारी आजी झाडलोट करण्यासाठी उठली. अंगणात बांधलेली गाय सोडण्यासाठी त्यांनी रवींद्र काळभोर यांना उठवण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र समोरचे दृश्य पाहून त्या प्रचंड हादरल्या. कारण रवींद्र काळभोर हे रक्ताच्या थारोळ्यात पालथे पडले होते. आणि त्यांच्या शेजारीच भला मोठा दगड पडला होता. त्यांनी घरातील इतरांना याची माहिती दिली.
दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा केला जात आहे. मात्र रवींद्र काळभोर यांचा खून कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप समोर आलं नाही. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.