पिंपरी : शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील इंटरनेटच्या वायरी, तांब्याच्या वायरी आणि लॅपटॉप असा १ लाख २५ हजारांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी दुकानातील सीसीटीव्हीच्या ८९ कॅमेऱ्यांची तोडफोड करून नुकसान केले. ताथवडे येथे शनिवारी (दि. २७) रात्री नऊ ते रविवारी (दि. २८) सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दुकानाचे मालक ब्रह्मा गेनबा सूर्यवंशी (वय ४१, रा. रायगड कॉलनी, नखातेवस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी ब्रह्मा यांचे ताथवडे चौकात इलेक्ट्रीकल साहित्य विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री नऊ ते रविवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांचे दुकान कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सीसीटीव्हीचे ८९ कॅमेरे फोडून नुकसान केले. तसेच इंटरनेटच्या वायरी, तांब्याच्या वायरी आणि लॅपटॉप असा १ लाख २५ हजारांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
अबब ..! सीसीटीव्हीचे तब्बल ८९ कॅमेरे फोडून दुकानात केली चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 18:01 IST