बापरे! कर्फ्यूदरम्यान चक्क इंस्टाग्रामवरून करत होते दारू विक्री; पोलिसांनी पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 18:22 IST2020-03-28T18:19:11+5:302020-03-28T18:22:16+5:30
या प्रकरणी विरार पोलिसांनी सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बापरे! कर्फ्यूदरम्यान चक्क इंस्टाग्रामवरून करत होते दारू विक्री; पोलिसांनी पकडले
विरार - देशभरात लॉकडाऊन असून कर्फ्यू काळात दारु विक्री करण्यास मनाई असतानाही सोशल मीडिया असलेल्या इन्स्टाग्रामवरून ऑनलाइन मद्यविक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ओशियन या बारचा मालक संतोष महंती (२९) आणि आकाश सावंत (२३) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन देशभरात जारी केला आहे. या कर्फ्यूदरम्यान मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. मात्र, तरी अनेक ठिकाणी बेकायदेशीर पध्दतीने मद्याची विक्री दामदुप्पट भावाने सुरू आहे. वसई परिसरात चक्क इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या मदतीने मद्याची विक्री करत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर 'द लिकर मॅन' या नावाने अकाऊंड उघडून दोन व्यक्ती अवैद्य दारूची विक्री करत होते. याबाबतची माहिती वसईचे अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांना मिळाली असता त्यांनी बनावट ग्राहकाद्वारे सापळा रचला आणि दारूविक्री करणाऱ्यास अटक केली आहे.