१८ लाखांची कॅश, ३ मजली बंगला आणि ५ प्लॉट; सिंचन विभागाच्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:45 IST2026-03-26T13:29:49+5:302026-03-26T13:45:20+5:30

ओडिशात सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यावर टाकण्यात आलेल्या छाप्यात मोठं घबाड सापडलं आहे.

Odisha Vigilance Seizes 18 Lakh Cash JCB and Concrete Mixer from Irrigation SDO | १८ लाखांची कॅश, ३ मजली बंगला आणि ५ प्लॉट; सिंचन विभागाच्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड

१८ लाखांची कॅश, ३ मजली बंगला आणि ५ प्लॉट; सिंचन विभागाच्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड

Odisha SDO Raid: ओडिशाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी भ्रष्टाचारविरोधी मोठी कारवाई करत एका सरकारी अधिकाऱ्याना पकडलं. गंजाम जिल्ह्यातील भंजनगर सिंचन विभागाचे उप-विभागीय अधिकारी पंचू बेहरा यांच्या मालमत्तेवर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींचे घबाड हाती लागले आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.

एकाच वेळी ५ ठिकाणी छापेमारी

विजिलेंस विभागाचे ३ डीएसपी, ७ पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी बेहरा यांच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये त्यांचे बरहमपूर येथील तीन मजली आलिशान घर, भंजनगरमधील सरकारी निवासस्थान, कार्यालय, पोलसरा येथील वडिलोपार्जित घर आणि एका नातेवाईकाच्या घराचा समावेश आहे.

तपासात काय काय आढळले?

छापेमारी दरम्यान अधिकारीही अवाक झाले. बेहरा यांच्याकडून एकूण १८,९०,८०० रुपये रोख जप्त करण्यात आले. ज्यामध्ये १५.१३ लाख हे बरहमपूरच्या घरातून तर ३.७२ लाख सरकारी क्वार्टरमधून जप्त करण्यात आले. २०२४ मध्ये ५७ लाख रुपयांना खरेदी केलेली एक काँक्रीट मिक्सर मशीन आणि २०२५ मध्ये ३७ लाख रुपयांना खरेदी केलेली एक जेसीबी मशीन देखील जप्त करण्यात आली आहे. तर बरहमपूरच्या वसंत विहारमध्ये ३५५० स्क्वेअर फुटांची तीन मजली इमारत आणि बरहमपूर शहराच्या आसपास ५ अत्यंत मौल्यवान भूखंडाची कागदपत्रे देखील ताब्यात घेण्यात आली आहे.

दागिने आणि गुंतवणुकीचा तपास सुरू

मालमत्तेच्या कागदपत्रांशिवाय, बेहरा यांच्या नावावर असलेले बँक डिपॉझिट, पोस्टातील गुंतवणूक आणि सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन अद्याप सुरू आहे. विजिलेंस विभागाच्या तांत्रिक टीमने जप्त केलेल्या भूखंडांची आणि इमारतीची मोजणी सुरू केली असून, या मालमत्तेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विजिलेंस कोर्टाच्या वॉरंटनंतर ही कारवाई करण्यात आली असून, एका मध्यम श्रेणीतील सरकारी अधिकाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात मशिनरी आणि रोख रक्कम सापडल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title : सिंचाई अधिकारी के यहाँ मिला खजाना: नकदी, घर और प्लॉट जब्त

Web Summary : ओडिशा के एक सिंचाई अधिकारी के आवास पर छापे में ₹18.9 लाख नकद, एक तीन मंजिला घर, पांच प्लॉट और महंगी मशीनरी मिली। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो बैंक जमा और गहनों की भी जांच कर रहा है।

Web Title : Irrigation Officer's Fortune Unearthed: Cash, House, and Plots Seized

Web Summary : An Odisha irrigation official faces corruption charges after a raid uncovered ₹18.9 lakhs in cash, a three-story house, five plots, and expensive machinery. The anti-corruption bureau is investigating further assets, including bank deposits and jewelry, revealing a potential fortune.