अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:55 IST2025-05-17T17:54:04+5:302025-05-17T17:55:00+5:30

एका तीन वर्षांच्या मुलीला रस्त्याच्या कडेला कोणीतरी सोडून दिलं. राजलक्ष्मी यांनी या मुलीला दत्तक घेतलं आणि स्वतःच्या मुलीसारखे वाढवलं. पण मुलीने मोठं झाल्यावर मित्रांच्या मदतीने आईची हत्या केली.

odisha abandoned as baby on roadside girl grows up to kill woman who adopted her secret revealed from instagram | अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ

फोटो - ndtv.in

ओडिशामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. ज्या अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं तिनेच आईचा काटा काढला आहे. एका तीन वर्षांच्या मुलीला रस्त्याच्या कडेला कोणीतरी सोडून दिलं. राजलक्ष्मी यांनी या मुलीला दत्तक घेतलं आणि स्वतःच्या मुलीसारखे वाढवलं. पण मुलीने मोठी झाल्यावर मित्रांच्या मदतीने आईची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने तिच्या दोन मित्रांसह २९ एप्रिल रोजी गजपती जिल्ह्यातील परलाखेमुंडी शहरातील घरात तिची ५४ वर्षीय आई राजलक्ष्मी कर हिची हत्या करण्याचा कट रचला. राजलक्ष्मी यांना त्यांच्या मुलीची या दोन मित्रांसोबत असलेली मैत्री खटकत होती. त्यांचा या मैत्रीला विरोध होता. त्यामुळे मुलीने आईची हत्या करून संपत्ती मिळवण्याचा प्लॅन केला. 

हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं नातेवाईकांना सांगितलं

मुलीने राजलक्ष्मी यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर उशीने गळा दाबला. यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टकांनी तिला मृत घोषित केलं. दुसऱ्या दिवशी भुवनेश्वरमध्ये नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं सर्व नातेवाईकांना सांगण्यात आलं. मुलीच्या प्लॅननुसार सर्व काही नीट चाललं होतं. राजलक्ष्मीला हार्ट अटॅक आला नव्हता तर तिची हत्या झाली होती असा संशयही कोणाला आला नाही.

मोबाईल चेक केला असता इन्स्टावरील चॅट समोर

राजलक्ष्मीच्या हत्येला १५ दिवस उलटून गेले. तोपर्यंत कोणालाही मुलीवर संशय आला नव्हता. याच दरम्यान राजलक्ष्मीचा भाऊ सिबा प्रसाद मिश्रा याला मुलीचा मोबाईल सापडला, जो भुवनेश्वरमध्येच राहिला होता. मोबाईल चेक केला असता इन्स्टाग्रामवरील चॅट समोर आलं, ज्यामध्ये हत्येचं नीट प्लॅनिंग केलं होतं. त्या चॅटमध्ये राजलक्ष्मीची हत्या करून तिचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम कशी मिळवायची याचा उल्लेख होता. हत्येची धक्कादायक बाब समोर आल्यावर मिश्रा यांनी १४ मे रोजी परलाखेमुंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

रस्त्याच्या कडेला सापडलेली मुलगी

तपास करून तीन आरोपींना अटक करण्यात आली, ज्यात मुलगी आणि तिच्या दोन मित्रांचा समावेश आहे. गणेश रथ आणि दिनेश साहू अशी दोन तरुणांची नावं आहेत. गजपतीचे पोलीस अधीक्षक (एसपी) जतिंद्र कुमार पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजलक्ष्मी आणि त्यांच्या पतीला सुमारे १४ वर्षांपूर्वी भुवनेश्वरमध्ये रस्त्याच्या कडेला मुलगी सापडली. या जोडप्याला मूल नव्हतं, म्हणून त्यांनी मुलीला दत्तक घेतलं आणि स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. राजलक्ष्मी यांच्या पतीचं नंतर निधन झालं. तेव्हापासून त्यांनी मुलीला एकटीने वाढवलं पण तिनेच आता आईची हत्या केली आहे. 
 

Web Title: odisha abandoned as baby on roadside girl grows up to kill woman who adopted her secret revealed from instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.