मास्क न घालण्यावरून महिलांनी क्लीन अप मार्शलच्या डोक्यात घातला पेव्हर ब्लॉक
By पूनम अपराज | Updated: December 3, 2020 20:21 IST2020-12-03T20:20:28+5:302020-12-03T20:21:13+5:30
Assaulting Case : याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मास्क न घालण्यावरून महिलांनी क्लीन अप मार्शलच्या डोक्यात घातला पेव्हर ब्लॉक
भांडुप रेल्वे स्थानकाजवळ दर्शना चौहान (२७) या क्लीन-अप मार्शलला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्शना चौहान या भांडुप रेल्वे स्थानकाजवळ मोतीबाई वाडी येथे त्यांच्या सहकार्यांसोबत मास्क न घातलेल्या नागरिकांवर कार्यवाही करत होत्या. त्यावेळी एक महिला या ठिकाणी मास्क न घालता उभी होती. दर्शना यांनी या महिलेला मास्क न घातल्याने विचारणा केली आणि त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. नंतर हाणामारीवरच प्रकरण न थांबता या महिला प्रवाशासोबत असलेल्या इतर दोन महिलांनी देखील दर्शना यांना मारहाण करत तिच्या डोक्यात पेवर ब्लॉक उचलून टाकला. या घटनेत दर्शना यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी रुग्णालयात दाखल केलं. या घटनेनंतर दर्शना यांना मारहाण करणाऱ्या रोहिणी दोंदे (२८), शोभा दोंदे आणि सीमा भेंडारे या तीन महिलांवर भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. यासंदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.