'अमर' नव्हे 'अकरम'! हिंदू नाव सांगून मैत्री, नोकरीचे आमिष अन्...; नराधमाला १० वर्षांचा कठोर कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:56 IST2025-11-27T12:55:03+5:302025-11-27T12:56:32+5:30
अकरमने स्वतःचे नाव 'अमर कुशवाहा' सांगून, कपाळावर टिळा लावलेला फोटो पाठवून तिचा विश्वास संपादन केला.

'अमर' नव्हे 'अकरम'! हिंदू नाव सांगून मैत्री, नोकरीचे आमिष अन्...; नराधमाला १० वर्षांचा कठोर कारावास
हिंदू नाव धारण करून एका विवाहित महिलेला जाळ्यात ओढणे, तिच्यावर बलात्कार करणे आणि नंतर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकणे भोपाळमधील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. भोपाळच्या एका न्यायालयाने मोहम्मद अकरम नावाच्या आरोपीला या घृणास्पद कृत्यांसाठी १० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सुमारे तीन वर्षे चाललेल्या या खटल्यामध्ये न्यायालयाने सबळ पुरावे आणि साक्षींच्या आधारावर हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
एका पेंटरचा नंबर शोधणाऱ्या महिलेला एका चुकीच्या कॉलमुळे मोहम्मद अकरमच्या रूपात फसवणुकीच्या जाळ्यात ओढले गेले. अकरमने स्वतःचे नाव 'अमर कुशवाहा' सांगून, कपाळावर टिळा लावलेला फोटो पाठवून तिचा विश्वास संपादन केला. मैत्री झाल्यावर नोकरीचे आमिष दाखवून तिला हॉटेलमध्ये नेऊन त्याने बलात्कार केला आणि त्यानंतर पीडितेवर आणि तिच्या लहान मुलांवर दबाव टाकून धर्म परिवर्तन करून बेगम बनण्यासाठी धमक्या दिल्या. न्यायव्यवस्थेने या आरोपीचे सर्व डाव उलटवले असून, त्याला आता कारागृहाची हवा खावी लागणार आहे.
असे रचले मैत्रीचे खोटे जाळे
हा धक्कादायक प्रकार १६ ऑक्टोबर २०२२ रोजी एमपी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला होता. पीडित महिला पेंटरचा नंबर शोधत असताना चुकून तिचा कॉल आरोपी मोहम्मद अकरमला लागला. या एका चुकीच्या कॉलचा गैरफायदा घेत आरोपीने तत्काळ व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवणे सुरू केले. त्याने आपले खरे नाव आणि ओळख पूर्णपणे लपवत स्वत:ला अमर कुशवाहा असल्याचे भासवले. महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने बाकायदा कपाळावर टिळा लावलेले फोटोही तिला पाठवले.
नोकरीचे आमिष अन् हॉटेलमध्ये क्रूर कृत्य
आरोपी अकरमने पहिल्या भेटीतच महिलेला एमपी नगर येथील 'मिलन रेस्टॉरंट'मध्ये बोलावले. तिथे त्याने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, ज्याला महिलेने तीव्र विरोध केला. विरोधामुळे तो शांत बसला, पण त्याने महिलेसोबतचा संपर्क तुटू दिला नाही.
दुसऱ्याच दिवशी, आरोपीने तिला नोकरी मिळवून देण्याचे मोठे आमिष दाखवले आणि बोर्ड ऑफिस परिसरात बोलावले. तिथून त्याने महिलेला हॉटेलमध्ये घेऊन गेला. हॉटेलच्या खोलीत त्याने महिलेला कोंडून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती दोन मुलांची आई असून तिचा पती कामानिमित्त घराबाहेर असतो.
बलात्कारानंतर धर्म परिवर्तनाचा दबाव
आपले घृणास्पद कृत्य पूर्ण झाल्यावर आरोपीने आपला खरा चेहरा दाखवला. त्याने आपले नाव मोहम्मद अकरम असल्याचे सांगून पीडितेला धक्का दिला. त्याने महिलेला आणि तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, तिच्यावर त्वरित धर्म परिवर्तन करून त्याच्याशी निकाह करण्याचा दबाव टाकला. पीडितेनुसार, अकरम वारंवार 'मी तुला माझी बेगम बनवणार' असे म्हणत होता.
अखेरीस पीडितेने हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणात शासनाच्या वतीने अपर लोक अभियोजक प्रीति श्रीवास्तव यांनी खटल्याची बाजू भक्कमपणे मांडली. उपलब्ध असलेले सर्व पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब विचारात घेत न्यायालयाने आरोपी मोहम्मद अकरम याला दोषी ठरवले आणि १० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली.