"कोणीच माझं वाकडं करू शकत नाही"; भाजप नगरसेविकेच्या पतीचा महिलेला धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 16:18 IST2025-12-28T16:11:04+5:302025-12-28T16:18:57+5:30

सत्तेच्या जोरावर महिलेला धमकावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

No one can touch me BJP Councilor Husband Arrested After Video of Him Threatening Rape Survivor Goes Viral | "कोणीच माझं वाकडं करू शकत नाही"; भाजप नगरसेविकेच्या पतीचा महिलेला धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल

"कोणीच माझं वाकडं करू शकत नाही"; भाजप नगरसेविकेच्या पतीचा महिलेला धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल

MP Crime: सत्तेची नशा आणि पदाचा गैरवापर करून एका महिलेचे शोषण करणाऱ्या भाजप नगरसेविकेच्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. माझं कोणीही वाकडं करू शकत नाही अशी धमकी देणाऱ्या या नराधमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने ही धडक कारवाई केली. पीडित महिलेने लावलेले आरोप आणि समोर आलेला व्हिडिओ पाहून संपूर्ण मध्य प्रदेश हादरून गेला आहे.

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील रामपूर परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपी अशोक सिंह, जो स्थानिक भाजप नगरसेविकेचा पती आहे, याच्यावर एका महिलेने गेल्या सहा महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. २२ डिसेंबर रोजी पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने अंगावर काटा आणणारे खुलासे केले आहेत.

चाकूच्या धाक दाखवून अत्याचार

पीडितेच्या म्हणण्यानुसार, अशोक सिंह याने सहा महिन्यांपूर्वी तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर या कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो वारंवार तिचे शोषण करत होता. जेव्हा कधी तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सत्तेचा वरदहस्त असल्याने आपण काहीही करू शकतो, अशा भ्रमात आरोपी होता.

"मीडियात टाक, माझं कोणी काही करू शकत नाही"

२६ डिसेंबर २०२५ रोजी या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर पसरला. या व्हिडिओमध्ये आरोपी एका दुकानात बसून महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करताना आणि धमकावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये महिला म्हणते, "मी हे सर्व सोशल मीडियावर टाकेन," त्यावर आरोपी अत्यंत निर्लज्जपणे उत्तर देतो, "टाक मीडियावर, माझं काहीच होणार नाही. कोणीही माझं काही करू शकत नाही."

जेव्हा महिला त्याला "तू माझ्यावर बलात्कार केलास," असे थेट सांगते, तेव्हाही तो तिला आव्हान देत "जा तुला जिथे तक्रार करायची आहे तिथे जा, बघू कोण काय करतंय ते," असे म्हणताना दिसतो. या व्हिडिओमुळे पोलिसांवर कारवाईसाठी दबाव वाढला.

पोलिसांची कारवाई आणि प्रशासनाचा इशारा

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि प्राथमिक तपासात तथ्य आढळल्यानंतर रामपूर पोलिसांनी रात्री उशिरा अशोक सिंहला ताब्यात घेतले. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७४, ७५(२), ७९, २९६(१) आणि ३५१(३) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कायदा सर्वांसाठी समान आहे. आरोपी कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे, याचा विचार न करता पीडितेला न्याय दिला जाईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीने इतर कोणाचे असे शोषण केले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Web Title: No one can touch me BJP Councilor Husband Arrested After Video of Him Threatening Rape Survivor Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.