"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:53 IST2025-08-09T10:51:40+5:302025-08-09T10:53:39+5:30
Crime UP : मंजय कुमार नामक तरुणाचे गावातीलच एका मुलीसोबत गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून मंजयची गर्लफ्रेंड गावातील दुसऱ्या तरुणासोबत बोलत होती.

"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
बिहारची राजधानी पटनामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे आपल्या गर्लफ्रेंडच्या घरासमोरच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना पटनाच्या धनरुआ येथील सेवती गावात घडली आहे. मंजय कुमार नामक तरुणाचे गावातीलच एका मुलीसोबत गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून मंजयची गर्लफ्रेंड गावातील दुसऱ्या तरुणासोबत बोलत होती. ही गोष्ट मंजयला सहन झाली नाही आणि प्रेयसीच्या या वागण्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खूप दुःखी झाला होता.
समजावूनही प्रेयसी ऐकली नाही!
मंजयला जेव्हा त्याच्या प्रेयसीच्या दुसऱ्या तरुणासोबतच्या वाढत्या जवळीकतेबद्दल कळले, तेव्हा त्याने तिला समजावले. सुरुवातीला ती मंजयचे बोलणे ऐकून दुसऱ्या तरुणाशी बोलणार नाही असे म्हणाली. मंजयने नुकताच तिला सोन्याचा लॉकेटही भेट दिला होता. पण, वचन देऊनही तिने पुन्हा त्याच तरुणासोबत बोलणे सुरू केले.
आपल्या प्रेयसीला लाख समजावूनही ती ऐकत नाही हे पाहून मंजय पूर्णपणे निराश झाला. अखेर, शुक्रवारी तो तिच्या घरासमोर गेला आणि देसी कट्ट्याने स्वतःच्या छातीत गोळी झाडून घेतली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले आणि त्यांनी मंजयला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांकडून तपास सुरू
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. घटनास्थळावरून पोलिसांनी कट्टा आणि रिकामी काडतुसे जप्त केली आहेत. मंजयच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये हे आत्महत्येचे प्रकरण प्रेमातील फसवणुकीमुळे घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मंजयच्या गर्लफ्रेंडची चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.