भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:48 IST2025-12-06T13:48:34+5:302025-12-06T13:48:49+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील इटावा येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे एका भाचीने प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी मामीचे सुमारे ३० लाख रुपयांचे दागिने चोरले. त्यानंतर हे दागिने तिने तिच्या प्रियकराकडे सोपवले.

भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...
उत्तर प्रदेशमधील इटावा येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे एका भाचीने प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी मामीचे सुमारे ३० लाख रुपयांचे दागिने चोरले. त्यानंतर हे दागिने तिने तिच्या प्रियकराकडे सोपवले. हे प्रकरण समोर आलं तेव्हा तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी या पूर्ण प्रकरणाचा उलगडा करताना भाची आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हे दोघेही लग्न करण्यासाठी घरातून पळण्याच्या तयारीत होते.
हे संपूर्ण प्रकरण बकेवर क्षेत्रातील इंद्राऊखी गावातील आहे. येथे राहणाऱ्या कामिनी नावाच्या महिलेने तिच्या घरात ठेवलेले दागिने अचानक गायब झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. या दागिन्यांची किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान, तपासामधून ही चोरी घरातीलच कुणीतरी व्यक्तीने केल्याचा अंदाज पोलिसांना आला.
त्यानंतर तपास करणाऱ्या पोलिसांच्या पथकाने कामिनीची भाची आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेत कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान, या दोघांनीही गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सांगितले की, सदर भाची गेल्या काही काळापासून मामा-मामीच्या घरी राहत होती. तसेच मामीने तिचे दागिने कुठे ठेवले आहेत, याची तिला माहिती होती. कुटुंबीयांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिने संधी साधून हे सारे दागिने लांबवले आणि ते तिचा प्रियकर असलेल्या योगेश याला दिले.
२२ वर्षीय योगेशने लग्नाचं आमिष दाखवून वारंवार दागिने मागवले होते. तसेच सर्व दागिने हाती आले. तेव्हा लग्न करण्यासाठी पळण्याची तयारी त्यांनी केली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते पकडले गेले.