एल्गार परिषदेच्या तपासासाठी एनआयए'ची टीम पुण्यात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 20:34 IST2020-01-27T20:29:41+5:302020-01-27T20:34:23+5:30
या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांना त्यासाठीचे पत्र देण्यात आले.

एल्गार परिषदेच्या तपासासाठी एनआयए'ची टीम पुण्यात दाखल
पुणे - महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये एल्गार परिषदेच्या तपासावरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच आज केंद्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत. एनआयएच्या या पथकानं पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात एल्गार परिषद प्रकरणाच्या कागदपत्रांची तपासणीसाठी मागणी केली. विशेष म्हणजे एनआयएचं पथक पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी कागदपत्रं ताब्यात देण्याची मागणी पुणे पोलिसांकडे केली. यावेळी एनआयए'चे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांच्यासह ८ जणांची टीम पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांना त्यासाठीचे पत्र देण्यात आले. मात्र, पुणे पोलिसांनी त्यांच्याकडे शासनाकडून अजून अधिकृत पत्र न आल्याने आज तरी कागदपत्र दिली नसल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.
एल्गार प्रकरणाची कागदपत्रं ताब्यात घेण्यासाठी एनआयएची टीम पुणे पोलीस आयुक्तालयात https://www.lokmat.comhttps://www.lokmat.com/
— Lokmat (@MiLOKMAT) January 27, 2020
एनआयएच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीच्या स्थापनेची मागणी केली होती. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्रही लिहिलं होतं. मात्र, यानंतर तात्काळ केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वळवला आहे. त्यामुळे या प्रकरणात काही संशयास्पद असल्याची शंका स्वतः शरद पवार यांनी व्यक्त केली. केंद्राने प्रकरण एनआयएकडे दिल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्येच एनआयएची टीम पुण्यात दाखल झालं आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे आता राज्य आणि केंद्र सरकारमधील वाद पेटण्याची लक्षणं दिसत आहेत.