'तो पत्नीला लेस्बियन म्हणायचा, त्याच्या आईनेही...'; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:47 IST2025-08-06T11:41:20+5:302025-08-06T11:47:47+5:30
उत्तर प्रदेशात मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणाला बहिणीच्या खुलाशानंतर वेगळं वळण लागलं आहे.

'तो पत्नीला लेस्बियन म्हणायचा, त्याच्या आईनेही...'; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासा
Merchant Navy officer Wife Death:उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एका मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. कुटुंबातील सदस्यांनी पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले. तर विवाहित महिलेच्या कुटुंबीयांनी पतीवर तिची हत्या करून मृतदेह लटकवल्याचा आरोप केला. मधु आणि अनुराग या दोघांचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनेच्या आदल्या रात्री अनुराग-मधुमध्ये कशावरून तरी वाद झाला होता. त्यानंतर महिलेच्या पालकांना तिच्या आत्महत्येची माहिती देण्यात आली.
मधूचे लग्न एका मॅट्रिमोनियल साईटद्वारे झाले होते. तिच्या वडिलांनी त्यांच्या क्षमतेनुसार खूप खर्च केला. लग्नानंतर अनुराग १५ लाख रुपयांची मागणी करत होता. तो मधूवर समलिंगी असल्याचा आरोप करत हो. तो तिला दारू पिण्यास भाग पाडत असे. तो एखाद्या मनोरुग्णासारखा वागायचा. १० मार्च रोजी त्याने पहिल्यांदाच मधुला खूप मारहाण केली. तिने मला रडत रडत फोन केला. ती घरी येण्याबद्दल बोलत होती. मी तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तिचा रडणारा आवाज अजूनही मला त्रास देत आहे, असं मधुच्या मोठ्या बहिणीने सांगितले.
लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटीमधील ओमॅक्स वॉटर एस्केप कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या मधुचा मृतदेह सोमवारी तिच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला. पती अनुरागने मधुने आत्महत्या केल्याचे सांगितले. तर तिच्या पालकांनी पतीवर हत्येचा आरोप केला आहे. सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
"अनुराग आणि मधुचे लग्न त्याच्या काका-काकूंनी ठरवले होते. लग्नानंतर १५ दिवस सर्व काही ठीक होते, पण नंतर त्यांनी मधुचा छळ सुरू केला. १० मार्च रोजी प्लेट ठेवल्यावरुन मधुला मारहाण करण्यात आली. तिने रडत फोन केला आणि म्हणाली की ये आणि मला घेऊन जा, नाहीतर अनुराग मला मारून टाकेल. अनुराग एका मनोरुग्णासारखा वागायचा. तो नेहमीच संशय घ्यायचा. लग्नानंतर त्याने तिची सोशल लाईफ संपवली. तो तिला कोणत्याही मित्राशी बोलू देत नव्हता. त्याने तिला कुटुंबाशी बोलण्यापासूनही रोखले. आमच्या बहिणीचे आयुष्य उध्वस्त होऊ नये म्हणून आम्ही त्याच्याशी बोललो नाही," असं मधूच्या बहिणीने सांगितले.
"रविवारी रात्री अनुराग आणि मधु गाडी चालवायला बाहेर गेले होते. अनुराग गाडीत दारू प्यायला होता. तो मधुला गाडी चालवायला लावत होता. दोघेही अपार्टमेंटकडे जात असताना त्यांना एका खड्ड्यावर आदळले. यामुळे मधुने गाडी वळवली. त्यानंतर तो रागावला. त्याने त्यावेळी मुलांना पाहून गाडी वळवली का असं म्हटलं आणि तिला गाडीतच मारहाण केली. घरी गेल्यानंतर मधुने ही माहिती दिली. आम्ही तिला घरी येण्यास सांगितले तेव्हा तिने आता थांब, सकाळी ये असं म्हटलं. आमचं शेवटचे संभाषण रात्री १२.३० वाजता झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत काहीही संभाषण झाले नाही, त्यानंतर थेट मृत्यूची बातमी मिळाली. जेव्हा आम्ही अपार्टमेंटमध्ये पोहोचलो तेव्हा आम्हाला कळले की दोघांमध्ये मोठे भांडण सुरू होतं," अशीही माहिती मधुच्या बहिणीने दिली.
मधुचे कुटुंबिय जेव्हा अनुरागच्या घरी पोहोचले तेव्हा दुपट्ट्याचा फास कापलेला होता आणि मधु बेडवर पडली होती. अनुराग सांगत होता की त्याने ११.३० वाजता पोलिसांना कळवले होते. पोलिसांना कळवल्यानंतर पाच तासांनी त्याने कुटुंबाला कळवले. चौकशीदरम्यान मोलकरणीने सांगितले की तिने येऊन खूप दार वाजवले, पण आतून दार उघडले नाही. ३० एप्रिल रोजी अनुराग ड्युटीवर असल्याचे सांगून घराबाहेर पडला. त्याने सहा महिन्यांनी परत येईल असे सांगितले होते. तो अचानक २२ जुलै रोजी परतला. याचे कारण विचारले असता त्याने योग्य उत्तर दिले नाही असंही मधुच्या कुटुंबियांनी सांगितले.
"मधुला फिरायला आणि पार्टी करायला खूप आवडायचे. पण ती पार्टीत दारू आणि ड्रग्जपासून दूर राहायची. अनुरागच्या छळामुळे तिने बाहेर जाणेही बंद केले होते. अनुराग तिला दारू पिण्यास भाग पाडायचा. तिने नकार दिल्यास तो तिला मारहाण करायचा. तो अनेकदा तिचा अपमान करायचा. अनुराग इतका संशयी होता की तो तिचा मोबाईल फोनही वापरत असे. तो दररोज मधू कोणाशी आणि किती वेळ बोलते हे तपासत असे. तो तिच्यावर समलैंगिक असल्याचा आरोप करायचा. लग्नाच्या वेळी आईचे निधन झाल्याचे अनुरागकडून सांगण्यात आले. वडिलांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे लग्नाचे सर्व विधी आणि बोलणे त्याच्या काका-काकूंनी केले. काही दिवसांनी कळले की अनुरागच्या आईनेही आत्महत्या केली," असेही मधुच्या बहिणीने सांगितले.