NCBला मिळालं मोठं यश, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाच्या ड्रग्ज फॅक्टरीवर छापेमारी
By पूनम अपराज | Updated: January 21, 2021 17:26 IST2021-01-21T17:24:28+5:302021-01-21T17:26:09+5:30
NCB Raid : एनसीबीने या फॅक्टरीमधून मोठया प्रमाणावर एमडी (मेफेड्रोन) बनवण्यासाठी ठेवलेलं कच्चे सामान (रॉ मटेरियल) जप्त केले आहे.

NCBला मिळालं मोठं यश, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाच्या ड्रग्ज फॅक्टरीवर छापेमारी
मुंबई - मुंबईमध्ये ड्रग्जविरोधात मोहीम राबवण्यासाठी NCB ने कंबर कसली आहे. आता NCB ला मोठं यश मिळालं आहे. मुंबईच्या ठिकठिकाणी NCB कडून छापेमारी सुरु आहे. आज सकाळपासून सुरु असलेल्या एका ऑपरेशनमध्ये NCB ने दक्षिण मुंबईतील एका ड्रग्ज फॅक्टरीचे भांडाफोड केले आहे. हे ऑपरेशन अजूनही सुरु आहे. या ड्रग्ज फॅक्टरीशी संबंधित व्यक्तींची नावे आणि धागेदोरे यांची चौकशी केली जात आहे. या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्जचे उत्पादन केले जात होते. एनसीबीने या फॅक्टरीमधून मोठया प्रमाणावर एमडी (मेफेड्रोन) बनवण्यासाठी ठेवलेलं कच्चे सामान (रॉ मटेरियल) जप्त केले आहे.
ही फॅक्टरी ड्रग्ज माफिया आणि गँगस्टर चिंकू पठाण उर्फ परवेज खानच्या साथीदाराद्वारे चालवली जात होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी येथून ड्रग्सशिवाय अग्निशस्त्र आणि मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड करोडोंची असल्याचं बोललं जात आहे. २० जानेवारीला एनसीबीनी चिंकू पठाणला अटक केली. त्यानंतर ही मोठी छापेमारी करण्यात एनसीबीला यश आलं आहे.
चिंकू पठाण हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असून गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक देखील आहे. मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात सप्लाय केल्या जाणाऱ्या एमडी ड्रग्ज हे ७० टक्के चिंकू सप्लाय करत होता. एनसीबीद्वारे ड्रग्स फॅक्ट्री आणि त्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास केला जात आहे. चिंकूचे साथीदार इंटरनॅशनल ड्रॅग कार्टलशी जोडलेले आहेत, त्यांचे इंटरनॅशनल क्लाइंट्स देखील आहेत. आता एनसीबीने दक्षिण मुंबईत केलेल्या छापेमारीमुळे मुंबई आणि देशभरात पसरलेल्या अमली पदार्थाच्या जाळ्याचा पर्दाफाश होऊ शकतो.