छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:13 IST2025-10-25T15:12:08+5:302025-10-25T15:13:05+5:30
Naxal Attack: काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी एका भाजप कार्यकर्त्याची गळा दाबून हत्या केली होती.

छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
Naxal Attack: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचा समूळ नाश करण्याची शपथ घेतली आहे. अशातच, छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन निष्पाप गावकऱ्यांची क्रूरपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना उसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेलाकांकेर गावात घडली असून, या हत्येमुळं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
रात्रीच्या अंधारात धारदार शस्त्रांनी हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या एका पथकानं शुक्रवारी(दि.24) रात्री गावातील रवी कट्टम (25) आणि तिरुपती सोढी (38) या दोघांची धारदार शस्त्रांनी हत्या केली. घटनेनंतर नक्षलवादी तात्काळ जंगलाच्या दिशेनं फरार झाले. माहिती मिळताच पोलिस दल घटनास्थळी रवाना झाले आणि तपास सुरू केला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शेकडो नक्षलवाद्यांनी आत्मसर्मपण केलं, त्यानंतर अशाप्रकारची घटना घडली आहे.
STORY | Naxalites kill two villagers in Chhattisgarh's Bijapur
— Press Trust of India (@PTI_News) October 25, 2025
Two persons were attacked and killed by Naxalites in a village in Chhattisgarh's Bijapur district, police said on Saturday. The incident took place on Friday night in Nelakanker village, under the Usur police station… pic.twitter.com/luuYEV7WIx
भाजप कार्यकर्त्याचीही हत्या
यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी इलमिडी थाना क्षेत्रातील मुजालकांकेर गावात नक्षलवाद्यांनी भाजप कार्यकर्ता सत्यम पुनेमची गळा दाबून हत्या केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पुनेम हा स्थानिक भाजप मंडळात सक्रिय कार्यकर्ता होता. घटनेच्या ठिकाणाहून मिळालेल्या पत्रकात नक्षलवाद्यांच्या “मद्देड एरिया कमिटी”नं या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचं नमूद करण्यात आलं होतं. पत्रकात पुनेमवर पोलिसांना माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता.
बस्तरमध्ये वाढती नक्षल हिंसा
दरम्यान, बस्तर विभागातील सात जिल्ह्यांमध्ये चालू वर्षभरात सुमारे 40 लोक नक्षल हिंसेचे बळी ठरले आहेत. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत 11 भाजप नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. हे आकडे स्पष्ट दर्शवतात की, नक्षलवाद्यांचा प्रभाव या भागात अजूनही कमी झालेला नाही.