नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
By अझहर शेख | Updated: November 23, 2025 10:30 IST2025-11-23T10:28:42+5:302025-11-23T10:30:06+5:30
वन अधिकाऱ्यांनी शनिवारी संशयित आरोपी भरत उर्फ गोरख ढाढरचा ताबा घेतला होता

नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
अझहर शेख, नाशिक: बाऱ्हे वनपरिक्षेत्राच्या वन अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत कारागृहात असलेला तस्कर टोळीतील संशयित आरोपी भरत उर्फ गोरख ढाढर (३०,रा. भानवड, ता.धरमपुर, जि.वलसाड) याचा ताबा शनिवारी (दि.२२) घेतला होता. त्याला दुपारी बाऱ्हे वनविश्रामगृहात चौकशीसाठी आणले असता, त्याने वनपथकाच्या डोळ्यांत धुळफेक करत हातावर तुरी देऊन जंगलात पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली.
पेठ वनपरिक्षेत्रातील झरी-बेजवाड रस्त्यावरून गुजरातच्या दिशेने वेगाने तस्करांची एक टोळी सागाची लाकडे व दोन घोरपडींची शिकार करून घेऊन जाणाऱ्या टोळीला नाशिक वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) संयुक्त रात्र गस्ती पथकाने कुठलीही पर्वा न करता पाठलाग मंगळवारी मध्यरात्री सुरू केला होता. यावेळी टोळीने त्यांच्या जीपने (जीजे ०५ - बीएस ४९४०) समोरून येणाऱ्या पथकाच्या जीपला (एमएच ४९ - यू ४२९५) जोरदार धडक दिली होती.
अंधाराचा फायदा घेत टोळी पसार होण्याच्या प्रयत्नात असताना सशस्त्र पथकाने त्यांचा जंगलात पायी सिनेस्टाइल पाठलाग करत पकडले होते. या टोळीत फरार भरत याचाही समावेश होता. या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी त्याच्यासह पाच साथीदारांना देण्यात आली होती. यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत कारागृहात रवानगी करण्यात आाली. वनविकासच्या पथकाने मोठ्या धाडसाने पकडलेल्या टोळीतील एक आरोपी प्रादेशिक वन पथकाच्या ताब्यातून निसटून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, पेठ पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
न्यायालयाच्या आदेशाने ताबा
बाऱ्हे वनपरिक्षेत्राच्या अभिलेखावरील ठाणगाव वनपरिमंडळांतर्गत मागीलवर्षी दाखल एका वनगुन्ह्यात भरतचा सहभाग असल्याने त्या गुन्ह्याच्या तपासाकरिता कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भरतचा ताबा मिळावा यासाठी पेठ न्यायदंडाधिकारी यांच्याकडे शुक्रवारी (दि.२१) वनपरिमंडळ अधिकारी यांनी अर्ज करण्यात आला होता. या अर्जानुसार आरोपीचा ताबा दिला जावा याबाबत न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना आदेशित केले होते.
रात्री उशिरापर्यंत शोध
शनिवारी त्याचा ताबा वनपथक बाऱ्हे प्रादेशिक यांच्याकडे कारागृहाने दिला. त्याला चौकशीसाठी येथील विश्रामगृहात आणले असता त्याने बनाव करत विश्रामगृहातून बाहेर येत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. रात्री उशिरापर्यंत बाऱ्हे वनपरिक्षेत्राचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह फिरते दक्षता पथक त्याचा शोध घेत होते; मात्र तो उशिरापर्यंत हाती लागला नाही.