Nashik crime: नाशिक शहरामध्ये रंगपंचमीच्या रात्री बोधलेनगरच्या पाठीमागे असलेल्या आंबेडकरवाडी येथील सार्वजनिक शौचालयासमोर टोळक्याने उमेश आणि प्रशांत जाधव या सख्ख्या भावांचा निघृणपणे हत्या केली होती. या खून प्रकरणाची स्थानिक विशेष तपास पथकाकडून सखोल तपास केला जात आहे. या पथकाने आतापर्यंत तीन आरोपी निष्पन्न केले आहे. गुंडांविरोधी पथकाने पुन्हा एका आरोपीला ठाणे येथील एका झोपडपट्टीत सापळा रचून शिताफीने जाळ्यात घेतले. (Nashik Crime news in Marathi)
रूपेश दिलीप रोकडे (३९) असे अटक केलेल्या नवव्या आरोपीचे नाव आहे. दोन टोळ्यांच्या वर्चस्ववादातून १९ मार्चला आंबेडकरवाडीमध्ये जाधव बंधुंच्या दुहेरी हत्याकांडाची घटना घडली होती.
एसआयटी करतेय दुहेरी हत्याकांडाचा तपास
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या खून प्रकरणात सखोल तपासाकरिता स्वतंत्ररीत्या स्थानिक विशेष तपास पथकाने 'एसआयटी' स्थापन केली आहे. या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, दुचाकी, तसेच हत्यारेही एसआयटीकडून जप्त करण्यात आली आहेत.
घरातच लपवले होते हत्येसाठी वापरलेले कोयते
आठवा संशयित आरोपी रिक्षा चालक नीलेश उर्फ गोळ्या शांताराम महाजन याच्या घरात तीन कोयते एका गोणीत दडवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी महाजन याची कसून चौकशी केल्यानंतर रविवारी (४) त्याच्या घरातून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त केली.
जाधव बंधू हत्या: आतापर्यंत कोणाला झाली आहे अटक?
या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी संशयित सागर मधुकर गरड, अनिल विष्णू रेडेकर, सचिन विष्णू रेडेकर, योगेश चंद्रकांत रोकडे, अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे, योगेश मधुकर गरड, मंगेश चंद्रकांत रोकडे यांना अटक केली आहे. त्यांची सोमवारी (५ मे) पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले असता, त्यांची मध्यवर्ती कारागृहात न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे.
ठाण्यातील मनोरमानगरमध्ये लपला होता नववा आरोपी
दुहेरी खून प्रकरणात नववा आरोपी रूपेश रोकडे हा ठाणे जिल्ह्यातील मनोरमानगर आदिवासी चाळ येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. रूपेश हा तेथे अस्तित्व लपवून वास्तव्य करत असल्याबाबतची माहिती सहायक पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळाली होती.
मोहिते यांनी पथकासह ठाणे गाठून त्यास शिताफीने जाळ्यात घेतले. खुनात वापरलेली हत्यारे दडविण्यासाठी व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये याचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. यास मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.