Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलीस चौकीत 'झिंग झिंग झिंगाट'; मद्यपी पोलिसांकडून नागरिकाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 10:47 IST2022-03-16T10:46:16+5:302022-03-16T10:47:46+5:30
Police Drunk in Police Station: कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अशाप्रकारे पोलिस चौकीतच दारू पार्टी रंगवून चौकीचा 'बार' बनविल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मद्यपी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांनी केली आहे.

Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलीस चौकीत 'झिंग झिंग झिंगाट'; मद्यपी पोलिसांकडून नागरिकाला मारहाण
नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी.के.नगर पोलीस चौकीमध्ये मंगळवारी (दि.15) रात्री 11 वाजेच्या सुमारास पोलिसांची ओली पार्टी रंगलेली आढळून आली. टवाळखोरांची तक्रार देण्यासाठी जागरूक नागरिक गेला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी 55 ते 60वर्षीय नागरिकाला चौकीत घेऊन दरवाजा लावून घेत लाईट बंद करून बेदम मारहाण केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
गंगापूर रोड आकाशवाणी टॉवर, निर्मला कॉन्व्हेंट शाळेचा परिसर सुशिक्षित उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. या भागातील डी.के नगर पोलीस चौकीत बाळासाहेब शिंदे हे उद्यानात बसलेल्या टवाळखोरांची तक्रार देण्यासाठी गेले होते. यावेळी चौकीत 5 ते 6पोलीस कर्मचारी ओली पार्टीत 'झिंगाट' झालेले होते. त्यांनी त्यांना आतमध्ये बोलावून घेतले आणि लाईट बंद करून मारहाण केली, असे येथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. हा प्रकार जेव्हा परिसरात समजला तेव्हा रहिवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली. यावेळी एका मद्यपी पोलिसाने शिवीगाळ करत चौकीतून पळ काढला. नागरिकांनी दुचाकीने पाठलाग करत त्याला रोखले. त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले असता नंतर तो पोलीस चौकीत आला.
कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अशाप्रकारे पोलिस चौकीतच दारू पार्टी रंगवून चौकीचा 'बार' बनविल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मद्यपी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांनी केली आहे. यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती नागरिकांनी गंगापूर पोलिस ठाण्यात कळविली असता त्यांनतर घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आदी अधिकारी दाखल झाले. दरम्यान, शिंदे यांनी तक्रार देण्यासाठी गंगापूर पोलीस ठाणे गाठले. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुनाथ ठाकूर, सागर बोधले, सुरेश जाधव, मयूर सिंग असे पार्टी करणाऱ्या संशयित पोलिसांची नावे आहेत.
मद्यपी पोलिसांपैकी एकाला रात्री पोलिसांनी ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते बाकीचे चार फरार झाले. त्यांची वैद्यकीय तपासणी होऊ शकली नाही. कायदा व शिस्तप्रिय आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस आयुक्त दीपक पांडेय याप्रकरणी काय भूमिका घेतात आणि मद्यपी पोलिसांवर काय कारवाई चे आदेश देतात, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.