नाशिक अत्याचार प्रकरण: धर्मांतराचा डाव, पीडितेला उपवासासह विशिष्ट कपडेच घालण्याचा दबाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:49 IST2026-04-11T09:49:02+5:302026-04-11T09:49:44+5:30
धर्मांतरासाठी ब्रेनवॉश, देवदेवतांचे फोटो डिलीट करण्याची बळजबरी

नाशिक अत्याचार प्रकरण: धर्मांतराचा डाव, पीडितेला उपवासासह विशिष्ट कपडेच घालण्याचा दबाव
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: येथील मुंबई नाका परिसरातील बहुराष्ट्रीय कंपनीत घडलेल्या लैंगिक अत्याचार, तसेच धर्मांतर प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, धर्मांतराचा डाव पूर्वनियोजित असल्याचे उघड झाले आहे. संशयितांनी हिंदू तरुणींना विशिष्ट कपडे परिधान करण्यासाठी दबाव टाकतानाच एका पीडितेला महिनाभर उपवास करण्यासही भाग पाडल्याचे समोर आले आहे.
पहिल्या गुन्ह्यातील पीडितेने हिंदू तरुणींकडून आलेले जेवणाचे निमंत्रण टाळले होते. धर्मांतरासाठी तिचा ब्रेनवॉश केल्याने तसा पगडा तिच्यावर बसला होता. मोबाइलमधील देवदेवतांचे फोटोदेखील डिलीट करण्यास संशयित तरुण भाग पाडत असत. तिने लिपस्टिक लावणे सोडले होते. संशयितांनी कंपनीत अनेकवेळा प्रार्थना करत कट्टर धार्मिकता दर्शविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी सहा संशयितांना बेड्या ठोकल्या असून एकूण ९ गुन्हे दाखल आहेत.
महिला मॅनेजरला काेठडी
या प्रकरणातील संशयित आरोपी तथा कंपनीची ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चैनानीला १३ एप्रिलपर्यंत पाेलिस कोठडी सुनावण्यात आली आहे; तर अटकेतील पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शफी भिकन शेख, असिफ आफताब, शाहरूख कुरेशी, रझा मेमन, दानीश शेख आणि तौसीफ अत्तार यांना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या होत्या. आश्विनी चैनानीला गुरुवारी पुण्यातून ताब्यात घेण्यात आले होते.
आठपैकी दोघी विवाहित, एका तरुणाचे धर्मांतर?
- याप्रकरणी आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आठपैकी दोन महिला विवाहित, तर सहा तरुणी अविवाहित आहेत.
- नऊपैकी एका गुन्ह्यात लैंगिक अत्याचारासह धर्मांतराचा प्रयत्न झाला असून, दुसऱ्या गुन्ह्यात एका तरुणाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला आहे.
- उर्वरित सहा गुन्ह्यांत पीडितांसोबत लैंगिक जवळीक साधून धार्मिक भावना दुखविण्यात आल्याचा आराेप तक्रारदारांनी केला आहे.
कंपनी कार्यालयावर भाजपची धडक
महिलांवरील विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे, तसेच एका युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर शुक्रवारी (दि. १०) भारतीय जनता युवा मोर्चाकडून तीव्र आंदोलन करण्यात आले.