"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:48 IST2025-05-21T19:47:33+5:302025-05-21T19:48:10+5:30

प्रेमसंबंधांमुळे आम्ही लेकीच्या सुखाचा विचार केला. ते मागत गेले आणि आम्ही देत गेलो. माझ्या देण्याचा हेतू एकच होता माझी मुलगी सुखात राहावी असं तिच्या वडिलांनी म्हटलं.

"My daughter was killed like an animal, I don't know where she kept her baby"; Vaishnavi Hagvane father Anand Kaspate | "माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश

"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश

पुणे - माझ्या लेकीचं बाळ कुठे आहे हे आम्हाला आजही माहिती नाही. परवा एकाने माहिती दिली. ते बाळ मुलीच्या सासऱ्यांनी एका ठिकाणी ठेवले होते. तिथे आमचे नातेवाईक बाळाची मागणी करायला गेले असता त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाने दमदाटी करून बाळ देण्यास नकार दिला. त्याने कमरेला बंदूक लावली होती असा धक्कादायक आरोप वैष्णवी हगवणेच्या वडिलांनी केला आहे.

आनंद कसपाटे म्हणाले की, जसं माझ्या मुलीला मारले तसे हे माझ्या नातवाला मारून टाकायला कमी करणार नाहीत. माझ्या मुलीचे बाळ आम्हाला द्या. त्याचे संगोपन आम्ही करू. माझ्या मुलीला एखाद्या जनावरासारखं मारहाण करण्यात आली. तिच्या पाठीवर, छातीवर आणि डोक्यावरही मारहाणीच्या खूणा आहेत. मी स्वत: पाहिले आहे. तिचा मृतदेह माझ्या डोळ्यासमोर होता. शरीरावर अनेक जखमा होत्या.  काळीनिळी पाठ झाली होती. एवढे तिला मारहाण करण्यात आली आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच प्रेमसंबंधांमुळे आम्ही लेकीच्या सुखाचा विचार केला. ते मागत गेले आणि आम्ही देत गेलो. माझ्या देण्याचा हेतू एकच होता माझी मुलगी  सुखात राहावी. पण पैशाच्या हवास्यापोटी त्यांनी लेकीसोबत हे कृत्य केले. लग्न झाल्याच्या ५ महिन्यापासूनच लेकीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. गौरी-गणपतीला ती घरी आली होती, तेव्हा चांदीची गौरी सासरच्यांनी मागितली असं सांगितले. तेदेखील आम्ही दिले. लग्न ठरवताना फॉर्चुनर गाडी, ७-८ किलो चांदीची भांडी दिली, सोने दिले. मोठ्या दिमाखात लग्न लावले. लग्नाला दादाही उपस्थित होते. जावई संशय घेत होते, नणंद-सासू वाद काढायचे. तिला टॉर्चर केले जात होते. दीड-दोन महिने झाल्यानंतर सासू-नणंद लेकीला माहेरी आणून सोडायचे असा आरोप वैष्णवी हगवणे यांच्या वडिलांनी केला आहे.

दरम्यान, हा हुंडाबळी असून पैशांची मागणी वारंवार केली जात होती. मी अजितदादांना विनंती करतो, आपल्या लाडक्या बहिणीला न्याय द्या. आज तुमचे नेते, कार्यकर्ते सुनांवर अत्याचार करत आहेत. या लोकांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. हे लोक बाहेर फिरतात कसे? वैष्णवी मला कायम म्हणायची, मामा..माझा निर्णय चुकला. तिने तिची खंत माझ्याकडे बोलून दाखवली होती. हे लोक मला खूप त्रास देतायेत असं वैष्णवीने मला सांगितल्याने तिच्या मामाने सांगितले. 
 

Web Title: "My daughter was killed like an animal, I don't know where she kept her baby"; Vaishnavi Hagvane father Anand Kaspate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.