मुस्कान-साहिलचा होणार 'आमना-सामना', 14 दिवसांनंतर एकमेकांना बघणार; आज न्यायालयात काय घडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:10 IST2025-04-02T10:09:58+5:302025-04-02T10:10:55+5:30
या दोघांचीही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पूर्ण होत आहे.

मुस्कान-साहिलचा होणार 'आमना-सामना', 14 दिवसांनंतर एकमेकांना बघणार; आज न्यायालयात काय घडणार?
पतीच्या हत्येच्या आरोपाखाली कारागृहात बंद असेली मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांचा आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमना-सामना होणार आहे. या दोघांचीही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पूर्ण होत आहे. यामुळे या दोघांनाही ऑनलाइन पद्धतीने न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी, हे दोघेही एकमेकांना पाहू आणि ऐकूही शकणार आहेत.
वेगवेगळ्या बॅरेकमध्ये राहतायत मुस्कान आणि साहिल -
मेरठ जिल्हा कारागृह प्रशासनाने कारागृहाच्या नियमांनुसार मुस्कान आणि साहिल यांना वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले आहे. या दोघांनीही एकाच बॅरेकमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र कारागृहाच्या नियमावलीतील नियमांमुळे ते शक्य झाले नाही. यासंदर्भात बोलताना, कोणताही निर्णय कारागृह प्रशासनाच्या नियमांनुसारच घेतला जातो आणि सध्या दोघांनाही वेगवेगळ्या बॅरेकमध्येच राहावे लागेल, असे असे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कारागृहात काम करण्याची परवानगी -
कारागृह प्रशासनाने दोघांनाही त्यांच्या आवडीनुसार तुरुंगात काम करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार, मुस्कानने शिवणकाम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर, साहिलने शेती काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारागृह प्रशासनाने त्यांची ही मागणी मान्य केली असून, त्यांना त्याच्या इच्छेनुसार काम दिले आहे. यामुळे, त्यांचा कारागृहातील वेळही जाईल आणि त्यांच्या वर्तनाचे मूल्यांकनही केले जाईल.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती -
आजच्या ऑनलाइन सुनावणीत, मुस्कान आणि साहिल एकमेकांना पाहू शकतील. दरम्यान, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरही लक्ष राहील. त्यांना त्यांच्या कृत्याचा खेद वाटतो का? की ते अजूनही बेफिकीरच आहेत? हेही अभ्यासले जाईल. या प्रकरणाची पुढील कारवाई न्यायालय निश्चित करेल आणि दोघांच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ केली जाऊ शकते अथवा नवीन आदेशही दिला जाऊ शकतो.