ड्युटीवर झोपल्याचे फोटो काढल्याने सुरक्षा असिस्टंटवर खुनी हल्ला; मारुंजी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 12:50 IST2020-08-25T12:50:19+5:302020-08-25T12:50:39+5:30
आरोपी पुणे मेट्रोच्या रिच दोन येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता..

ड्युटीवर झोपल्याचे फोटो काढल्याने सुरक्षा असिस्टंटवर खुनी हल्ला; मारुंजी येथील घटना
पिंपरी : मेट्रोच्या साईटवर ड्युटीवर असलेला सुरक्षा रक्षक झोपला. त्यावेळी त्याचे फोटो काढून वरिष्ठांना पाठवले. त्या रागातून सुरक्षा रक्षकाने फोटो काढणाऱ्या सुरक्षा असिस्टंटवर खुनी हल्ला केला. मारुंजी शिवार वस्ती येथे २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा ते साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
चंदन अरविंदकुमार मिश्रा (वय २४, रा. भूमकर चौक, वाकड, मूळ रा. बिहार) असे जखमी स्टोअर असिस्टंटचे नाव आहे. विनोद माधवराव खंडाईत (वय ४५, रा. बुचडे चाळ, मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, १७ वर्षीय सुरक्षा रक्षक मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुणे मेट्रोच्या रिच दोन येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. ड्युटीवर असताना तो झोपला. त्याचे झोपल्याचे फोटो स्टोअर असिस्टंट चंदन मिश्रा यांनी काढले आणि ते फोटो स्टोअर व्यवस्थापकांना दाखवले. या कारणावरून आरोपीने चंदन यांना शिवीगाळ करून लोखंडी पाईपने डोक्यात मारून खुनी हल्ला केला. त्यानंतर सिमेंटचा ब्लॉक चंदन यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादी विनोद हे चंदन यांना वाचविण्यासाठी गेले असता आरोपीने विनोद यांना मारण्याची धमकी दिली.