Mumbai Crime: पत्नीची हत्या करून पळालेल्या खुन्याची भांडूपमध्ये लोकलखाली येत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 07:00 IST2025-11-29T07:00:59+5:302025-11-29T07:00:59+5:30
Mumbai Crime News: मोबाइलमुळे चेहरा उघड झाला. मृत झालेल्या पोपटकडे एक तुटलेल्या अवस्थेत मोबाइल आढळला.

Mumbai Crime: पत्नीची हत्या करून पळालेल्या खुन्याची भांडूपमध्ये लोकलखाली येत आत्महत्या
डोंबिवली : पत्नी ज्योती हिचा गळा दाबून खून करून पसार झालेल्या पोपट दाहिजे (वय ३६) याने भांडुप येथे लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करत खुनाचा गुन्हा दाखल केला. याला मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.
पोपट हा बांधकामाच्या ठिकाणी बिगारी म्हणून काम करत होता. मानपाडा पोलिस ठाण्यात पोपटविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सोमवारी सकाळी भांडुप रेल्वे स्थानकात धावत्या लोकलखाली उडी मारून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. मोबाइलमुळे चेहरा उघड झाला. मृत झालेल्या पोपटकडे एक तुटलेल्या अवस्थेत मोबाइल आढळला. मोबाइल दुरुस्त करणाऱ्या दुकानदाराच्या मदतीने फोनचा आयएमईआय नंबर शोधला. ट्रेसिंग कॉल डिटेल्सवरून मोबाइलवर सर्वाधिक फोन केलेल्या नंबरवर संपर्क साधताच तो फोन मानपाडा पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांचा आढळला. यावरून मृत व्यक्ती हा पोपट असून, तो खुनाच्या गुन्ह्यात हवा होता, ही माहिती समोर आली.
वांद्रे-माहीमदरम्यान रुळ ओलांडताना एकाचा मृत्यू
वांद्रे आणि माहीम स्थानकांदरम्यान शुक्रवारी सकाळी रेल्वे रुळ ओलांडताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल वाहतुकीला मोठा फटका बसला. मृत व्यक्ती रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ट्रेनने धडक दिली. या अपघातामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सुमारे ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. लोकलमध्ये गर्दी होती. मृतदेह काढून टाकल्यानंतर आणि ट्रॅक क्लिअरन्स केल्यानंतर, रेल्वे सेवा हळूहळू पूर्ववत आपाण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.