लोखंडी पाट्याने मारहाण करुन आईचा खून;किरकोळ वादातून कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 19:21 IST2021-08-06T19:16:24+5:302021-08-06T19:21:33+5:30
Murder Case : शाम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुलोचना पवार या मुलगा शहाजी याच्याबरोबर रहिमतपूर बसस्थानकाजवळील संरक्षण भिंतीस लागून असलेल्या झोपडीत राहत होते.

लोखंडी पाट्याने मारहाण करुन आईचा खून;किरकोळ वादातून कृत्य
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे किरकोळ वादातून मुलाने आईच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी पाट्याने मारहाण केली. या मारहाणीत वयोवृद्ध आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर मुलगा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. शहाजी लाला पवार (वय ३६) असे अटक केलेल्या मुलाचे नाव असून तर सुलोचना लाला पवार (वय ७०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
शाम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुलोचना पवार या मुलगा शहाजी याच्याबरोबर रहिमतपूर बसस्थानकाजवळील संरक्षण भिंतीस लागून असलेल्या झोपडीत राहत होते. शहाजी पवार याला दारू पिण्याचे व्यसन होते. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास किरकोळ कारणावरून आई सुलोचना व मुलगा शहाजी यांच्यात भांडण झाले होते. रागाच्या भरात शहाजी पवार याने आईच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी पाट्याने मारहाण केली. या मारहाणीत सुलोचना पवार यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.
आरोपी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
संशयित आरोपी शहाजी पवार हा सकाळी स्वत:हून रहिमतपूर पोलिस ठाण्यात हजर झाला. आपण केलेल्या मारहाणीत आई सुलोचना पवार हिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्या माहितीनंतर पोलीसही काहीकाळ गोंधळले. पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेवून खातरजमा केली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती रहिमतपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कड यांनी दिली.