विवाहित महिलेचा गळा आवळून खून; आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 16:05 IST2021-10-06T16:03:30+5:302021-10-06T16:05:30+5:30
Murder Case : काटोल परिसरातील घटना

विवाहित महिलेचा गळा आवळून खून; आरोपी अटकेत
काटोल : आई वडिलांना भेटण्यासाठी शिवणी (मध्य प्रदेश) येथून काटोलला आलेल्या 25 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसावाडी शिवारातील सिमेंट पाईप कंपनीच्या आवारात मंगळवारी (दि. ५) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
अमलेश कुमार (१८, रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काटोल परिसरातील काटोल-सावरगाव मार्गावरील सिरसावाडी शिवारात सिमेंट पाईप कंपनी आहे. या कंपनी आरोपी अमलेश कुमार व मृत महिलेचे आई वडील कामगार म्हणून काम करतात. ती आई वडिलांना भेटण्यासाठी सिरसावाडी आली होती.
दरम्यान, बुधवार सकाळी तिचा याच कंपनीच्या परिसरात मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत चौकशी सुरू केली. शिवाय, अमलेश कुमारला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली. खून करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी काटोल पोलिसांनी भादंवि ३०२ अनवये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
महिलेचा गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला की नाही, हे उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल. त्यानंतर पुन्हा गुन्हे नोंदवले जाईल. - महादेव आचरेकर, ठाणेदार, काटोल पोलीस ठाणे