Murder of an Indian girl out of one-sided love; After the murder, the body was taken 400 km away and buried | एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची हत्या; मृतदेह ४०० किमी दूर नेऊन पुरला 

एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची हत्या; मृतदेह ४०० किमी दूर नेऊन पुरला 

ठळक मुद्देमृत तरुणीचे नाव जस्मिन असून ती मुळची पंजाबमधील संगरूर जिल्ह्याच्या नायारणगढ येथील रहिवासी आहे.

एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियामध्ये हत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा मृतदेह शहरापासून ४०० किलोमीटर दूर नेवून पुरला आहे. महत्वाचे म्हणजे संशयित आरोपी देखील भारतीय आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीसह त्याच्या काका आणि मावशीलाही बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित तिघांचीही कसून चौकशी केली जात आहे.

मृत तरुणीचे नाव जस्मिन असून ती मुळची पंजाबमधील संगरूर जिल्ह्याच्या नायारणगढ येथील रहिवासी आहे. तसेच आरोपी तरुणाचे नाव तारिकज्योत सिंह असून तो लुधियानाजवळील एका गावातील रहिवासी आहे. मृत तरुणी अडीच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात नर्सिंगच्या कोर्ससाठी गेली होती. यावेळी ती पार्ट टाइम नोकरीही करत होती. ती ज्याठिकाणी पार्ट टाइम नोकरी करत होती, तेथेच आरोपीही नोकरी करत होता. नोकरी करत असताना आरोपी जस्मीनला त्रास देऊ लागला. तसेच तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जस्मीनने याबाबतची तक्रार पोलिसांना दिली होती. शिवाय तारिक छेडून त्रास देत असल्याची माहिती तिने आपल्या घरच्यांनाही दिली होती, अशी माहिती तरुणीच्या मामाने दिली आहे. पोलिसांना आणि घरी सांगितल्यानंतर देखील आरोपीने तिला त्रास द्यायचं थांबवलं नाही.

अचानक जस्मिन गायब झाली. तिच्या घरच्यांचा तिच्याशी काही संपर्कही होऊ शकला नाही. त्यामुळे मृत तरुणीच्या नातेवाईकांनी जस्मीनच्या सहकाऱ्यास सांगून ऑस्ट्रेलियन पोलिसात तक्रार दाखल केली. जस्मिनच्या गायब होण्यामागे तारिकचा हात असू शकतो, असा संशयही व्यक्त करण्यात आला. यानंतर ऑस्ट्रेलियन पोलिसांनी आरोपी तारिकसोबतच त्याचा काका आणि मावशीलाही अटक केली आहे. पोलीस चौकशीदरम्यान आरोपी तारिकने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी ४०० किलोमीटर दूर पुरलेला मृतदेह ताब्यात घेतला आहे.

Web Title: Murder of an Indian girl out of one-sided love; After the murder, the body was taken 400 km away and buried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.