बलिया - उत्तर प्रदेशातील बलिया येथे भाजपा नेते मुन्ना बहादूर सिंह यांनी विद्युत विभागाच्या इंजिनिअरला बुटाने मारहाण केल्याच्या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. रविवारी जेव्हा पोलीस त्यांना मेडिकल तपासणीसाठी घेऊन गेले, त्याठिकाणी मोठा राडा झाला. मुन्ना बहादूर यांनी पोलीस वाहनात बसण्यास नकार दिला आणि त्यांच्या समर्थकांनी एकच गोंधळ घातला. त्यावेळी पोलिसांनी भाजपा नेते मुन्ना बहादूर यांना फरफटत वाहनात बसवले आणि तिथून घेऊन गेले.
रविवारी बलियात ही घटना घडली. भाजपा नेते मुन्ना बहादूर यांना इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यावेळी बहादूर यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले. मेडिकल तपासणीनंतर पोलिसांना तिथून त्यांना पुन्हा वाहनात बसण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी विरोध केला. त्यावेळी शेकडो समर्थक रुग्णालयाबाहेर जमले. यावेळी पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरू होती.
रुग्णालयातील गोंधळ आणि मुन्ना बहादूर यांनी पोलीस वाहनात बसण्यास नकार दिल्याने परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून पोलिसांनी फरफटत भाजपा नेत्याला घेऊन गेले आणि त्यानंतर वाहनात बसवले. मात्र पोलीस वाहनात बसण्यापूर्वी भाजपा नेते मुन्ना बहादूर यांनी मोठा ड्रामा केला. त्यांनी पोलीस आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. आम्ही लोकांचा आवाज उचलला तेव्हा इंजिनिअरच्या लोकांनी आमच्यावर हल्ला केला. आता पोलीस आम्हालाच अटक करत आहे असा दावा मुन्ना बहादूर यांनी केला.
काय आहे प्रकरण?
भारनियमनावरून त्रस्त लोकांची तक्रार घेऊन भाजपा नेते मुन्ना बहादूर विद्युत विभागातील इंजिनिअर श्रीलाल सिंह यांच्या कार्यालयात पोहचले. याठिकाणी चर्चेवेळी वाद झाला आणि मुन्ना यांनी इंजिनिअरला बुटाने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुन्ना यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप श्रीलाल सिंह यांनी केला तर इंजिनिअर आणि त्यांच्या लोकांनी आमच्यासोबत अपमानास्पद वागणूक देत आमच्या अंगावर आले असं मुन्ना बहादूर यांनी म्हटलं. या प्रकरणी विविध कलमाअंतर्गत इंजिनिअर मुन्ना बहादूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे बलियातील वातावरण तापले आहे.