ऑनलाईन घोटाळ्यात मुंबईच्या चार्टर्ड अकाउंटंटला लागला मोठा चुना;  बँकेचा तपशील सांगून २.२५ लाख लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:17 IST2025-05-20T13:07:00+5:302025-05-20T13:17:43+5:30

मुंबईत एका २४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने ऑनलाईन घोटाळ्यात २.२५ लाख रुपये गमावल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे .

Mumbai's chartered accountant gets scammed in online scam; 2.25 lakhs embezzled by giving bank details | ऑनलाईन घोटाळ्यात मुंबईच्या चार्टर्ड अकाउंटंटला लागला मोठा चुना;  बँकेचा तपशील सांगून २.२५ लाख लंपास

ऑनलाईन घोटाळ्यात मुंबईच्या चार्टर्ड अकाउंटंटला लागला मोठा चुना;  बँकेचा तपशील सांगून २.२५ लाख लंपास

सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढताना दिसत आहेत. मुंबईत एका २४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने ऑनलाईन घोटाळ्यात २.२५ लाख रुपये गमावल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे . अ‍ॅक्सिस बँकेच्या नवीन खातेधारकांना बोनस वाटण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नेहा पी. ही बोरिवली पश्चिम येथील रहिवासी असून, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे. नेहाने अलीकडेच वांद्रे पश्चिम येथील एका खाजगी कंपनीत काम करायला सुरुवात केली होती. या कंपनीत कर्मचाऱ्यांना पगारासाठी अ‍ॅक्सिस बँकेत खाते उघडणे बंधनकारक होते. त्यानुसार, नेहाचे अ‍ॅक्सिस बँकेत बचत खाते उघडण्यात आले.

खाते उघडल्यावर आला मेसेज...

अ‍ॅक्सिस बँकेत नवीन खाते उघडल्यानंतर, तिला एक संदेश आला, ज्यामध्ये बँक नवीन खातेधारकांना आकर्षक बोनस देत आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र, तिला प्रत्यक्षात कोणताही बोनस मिळाला नव्हता. या संदर्भात तिने बँकेच्या अधिकृत ईमेलद्वारे संपर्क साधला आणि पत्रव्यवहार सुरू केला.

या दरम्यान १७ मे रोजी दुपारी ३:४५ वाजता, नेहाला अ‍ॅक्सिस बँकेचा प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. त्याने तिचे पूर्ण नाव आणि बँकेला पाठवलेल्या तिच्या ईमेलचा संदर्भ यासह विशिष्ट माहिती दिली, ज्यामुळे तिला खात्री पटली की तो खरोखरच बँकेतून फोन करत आहे. फोन करणाऱ्याने तिला सांगितले की तांत्रिक अडचणींमुळे बोनस पेमेंटला उशीर होत आहे आणि तिला बँकिंग अॅप उघडण्यास सांगितले.

व्हिडीओ कॉल केला आणि ओटीपी पाहिला!

या संभाषणादरम्यान, त्याने प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी व्हिडीओ कॉल केला. बँकेचा कर्मचारी असल्याने नेहाने तो कॉल उचलला. त्याच क्षणी, तिच्या स्क्रीनवर एक वन-टाइम पासवर्ड अर्थात ओटीपी दिसला. स्कॅमरने व्हिडिओ कॉल दरम्यान दाखवलेला पाहिला आणि त्याच्या मदतीने तिच्या खात्यातून २.२५ लाख एका वेगळ्याच खात्यात ट्रान्सफर केले. 

"माझ्या घरी लग्नाचे कार्यक्रम सुरू असल्याने मी घाईत होते. त्या व्यक्तीने बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून मला संभाषणात गुंतवले. मी ओटीपी शेअर केला नाही, परंतु कॉल दरम्यान तो माझ्या स्क्रीनवर दिसत होता आणि त्याने त्याचा फायदा घेतला," असे नेहाने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. नेहाने तात्काळ महाराष्ट्र सायबर सेल हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. बँकेकडून माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Mumbai's chartered accountant gets scammed in online scam; 2.25 lakhs embezzled by giving bank details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.