"मला लग्न करायचंय, जामीन द्या", रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीची अजब मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:02 IST2026-03-10T12:01:32+5:302026-03-10T12:02:30+5:30
Rohit Shetty : चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी रितिक यादव याने आता अजब मागणी केली आहे.

"मला लग्न करायचंय, जामीन द्या", रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीची अजब मागणी
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी रितिक यादव याने आता अजब मागणी केली आहे. "मला लग्न करायचंय, जामीन द्या..." असं म्हटलं आहे. रितिकने स्वतःच्या लग्नासाठी तात्पुरता जामीन मिळण्यासाठी मकोका अंतर्गत सुनावणी करणारे न्या. सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात अर्ज केला.
१ फेब्रुवारी रोजी जुहू येथील शेट्टी यांच्या नऊ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर किमान पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक गोळी इमारतीतील जिमच्या काचेला लागली होती. या प्रकरणात अटक केलेले १२ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यापैकी यादव हा १४ फेब्रुवारी
रोजी हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी एक आहे.
११ मार्च रोजी रितिक यादवचं लग्न मूळगावी आग्रा येथे होणार आहे. त्यामुळे त्याने केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गोळीबाराचं कृत्य लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या शुभम लोणकर याने केल्याचे सांगितलं जातं. त्याने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ही जबाबदारी स्वीकारली आहे.
लोणकर हा राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणात तसेच अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातही फरार आरोपी आहे. या आरोपींविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून प्राथमिक तपासात दहशत निर्माण करण्याचा उद्देश असल्याचं समोर आलं आहे.