मुंबईत आई आली उदरनिर्वाहासाठी अन् बालिकेचे झाले अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 18:57 IST2019-09-30T18:53:47+5:302019-09-30T18:57:22+5:30
या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.

मुंबईत आई आली उदरनिर्वाहासाठी अन् बालिकेचे झाले अपहरण
ठाणे - आपल्या आईसमवेत जालन्यातून ठाण्यात आलेल्या दोन वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना ठाणेरेल्वे स्थानकात गुरुवारी घडली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.
जालना जिल्ह्यातील कुंभार-पिंपळगाव येथे राहणारी ३५ वर्षीय यमुना रोहित नरवडे हिचा नवरा काहीच कामकाज करत नाही. त्यामुळे रोजीरोटी कमविण्यासाठी तिने २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस पकडली. २५ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता ती ठाण्यात उतरली. या वेळी तिच्यासोबत पाच वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षीय मुलगी होती. ठाण्यात आल्यानंतर ती दिवसभर रेल्वे स्थानकातच बसून होती. रात्री जेवण केल्यानंतर दोन मुलांना घेऊन ती फलाट क्रमांक दहाबाहेर झोपी गेली.
उत्तररात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास त्यांना पोलिसांनी उठवून, येथे झोपू नका, असे सांगितले. परंतु त्यांच्याकडे दुसरीकडे निवारा नसल्याने पोलीस गेल्यावर ती पुन्हा मुलांना घेऊन झोपी गेली. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिला जाग आली, तेव्हा मुलगी तेथे नसल्याचे उघड झाले. त्यानुसार तिने कोपरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.