मदरशात शिकवणाऱ्या मुफ्तीनं ११ वर्षीय मुलावर १९ वेळा केला लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 20:21 IST2022-05-10T20:18:16+5:302022-05-10T20:21:16+5:30
Sexual Abuse : पीडित मुलाने सांगितले की, मुफ्ती त्याला वेगळ्या खोलीत नेऊन अश्लिल कृत्य करायचा आणि अश्लिल बोलायचा. तसेच इतर मुलांसोबतही तो असेच दुष्कृत्य करत होता.

मदरशात शिकवणाऱ्या मुफ्तीनं ११ वर्षीय मुलावर १९ वेळा केला लैंगिक अत्याचार
मेरठ - उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ जिल्ह्यातून एका संतापजनक बातमी समोर आली आहे. मदरशामध्ये शिकणाऱ्या एका 11 वर्षाच्या निष्पाप मुलासोबत तिथेच शिकवणाऱ्या मुफ्तीने तब्बल 19 वेळा दुष्कर्म केले आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर आरोपी मुफ्ती फरार झाला आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.
मेरठमधील मवाना येथे दावतुल इस्लाम नावाचा मदरसा आहे. येथे ही खळबळजनक घटना घडली. पीडित मुलगा हा सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह ठाणे परिसरातील रहिवासी आहे. तो मागील दीड वर्षांपासून मेरठ येथील मवाना येथील मदरशात राहत होता. ईदच्या दिवशी पीडित मुलाने सहारनपूर येथे आपल्या घरी गेल्यानंतर नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला.
पीडित मुलाने सांगितले की, मुफ्ती त्याला वेगळ्या खोलीत नेऊन अश्लिल कृत्य करायचा आणि अश्लिल बोलायचा. तसेच इतर मुलांसोबतही तो असेच दुष्कृत्य करत होता. यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी रविवार मवाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. मदरशाच्या मुफ्तीने इतर अनेक मुलांसोबतही दुष्कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबात असंतोष निर्माण झाला आहे. आरोपी मुफ्तीला अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांनी मदरसा येथे चौकशी केली असता तिथे २४ मुले शिकत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी इतर मुलांचेही जबाब नोंदवले आहेत. मुफ्तीने त्याच्या मालमत्तेच्या जोरावर बेकायदेशीर मदरसा उघडला आहे, अशी माहितीही काही जणांनी पोलिसांना दिली. मदरशाच्या आधार घेऊन तिथे शिकणाऱ्या मुलांसोबत हा नराधम मुफ्ती अनेक वर्षांपासून वाईट कृत्य करत आहे. पोलीस अधीक्षक केशव कुमार यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.