खासदारांनीच दाखल केला कर्मचाऱ्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:32 IST2020-12-12T00:32:29+5:302020-12-12T00:32:49+5:30
Crime News : गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची खोटी नावे पुढे करून गॅस सिलिंडर काळ्याबाजारात विकल्याचे निदर्शनास येताच एजन्सीचे मालक असलेल्या खासदार राजेंद्र गावित यांनी नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

खासदारांनीच दाखल केला कर्मचाऱ्यांवर गुन्हा
मीरा राेड : गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची खोटी नावे पुढे करून गॅस सिलिंडर काळ्याबाजारात विकल्याचे निदर्शनास येताच एजन्सीचे मालक असलेल्या खासदार राजेंद्र गावित यांनी नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यात एक शिवसेना महिला संघटक तथा माजी जिल्हा परिषद सदस्याचा पती आहे.
खा. गावित यांची पूर्वीपासूनच मीरा रोडच्या शांतीनगर भागात देव मोगरा या नावाने भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशनची गॅस एजन्सी आहे. कंपनीने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे सध्या प्रति गॅस सिलिंडरचे ५९४ रुपये घेणे बंधनकारक आहे. असे असताना एजन्सीमधील व्यवस्थापक हृदयनाथ देवेंद्र किणी (रा. चंद्रपाडा, नायगाव पूर्व), बुकिंग क्लार्क देवी कोले (रा. एबेल पॅरेडाइज, डी मार्टजवळ, भाईंदर पश्चिम) व लिपिक प्रभाकर लक्ष्मण कारभारी (रा. कोळीवाडा, नायगाव पश्चिम) या तिघांनी संगनमत करून ग्राहकांची खोटी नावे नोंदवून प्रति सिलिंडर ७०० रुपयेप्रमाणे काळ्याबाजारात विकत होते. याप्रकरणी पाेलीस अधिक तपास करीत आहेत.
हा प्रकार गावित यांच्या लक्षात येताच त्यांनी तिघा कर्मचाऱ्यांविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून किणी व कारभारी यांना अटक केली आहे. आरोपी हृदयनाथ किणी हा शिवसेना महिला संघटक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य चित्रा किणी यांचा पती आहे. फिर्याद देतेवेळी या आरोपींनी ५ सिलिंडर हे ग्राहकांची खोटी नावे देऊन काळ्याबाजारात विकल्याचे व २ हजार ९७० रुपयांचा अपहार केल्याचे नमूद केले आहे.