अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:49 IST2025-09-29T12:48:44+5:302025-09-29T12:49:13+5:30
आरोपी शेतकऱ्याने १२ म्हशींचे कुऱ्हाडीने कासे कापले.

अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
MP Crime:मध्य प्रदेशातील शिवपुरी येथून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. म्हशी शेतात चारा खायला येतात, यामुळे एक शेतकरी आणि त्याच्या दोन मुलांनी इतर शेतकऱ्यांच्या १२ म्हशींचे कासे आणि शिंगे कुऱ्हाडीने वार करुन कापल्याची लज्जास्पद घटना घडली आहे. यात म्हशी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवपुरी जिल्ह्यातील पिचोरे तहसीलच्या मायापूर पोलिस स्टेशन हद्दीतील शेरगढ गावात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली करत आरोपी शेतकरी आणि त्याच्या दोन्ही मुलांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ही अमानवीय घटना ऐकून, माणूस इतका खालच्या पातळीवर जाऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार कृपन सिंग गुर्जर यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांच्या १० म्हशी आणि इतर दोघांच्या दोन म्हशी गावाजवळील पठारावर चरत होत्या. यावेळी गावातील शेतकरी शिवदयाल लोधी आणि त्याची दोन मुले टिकाराम आणि अनिल लोधी यांनी अचानक म्हशींवर कुऱ्हाडीने हल्ले सुरू केले. आरोपींनी आधी म्हशींची शिंगे कापली.
एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर त्यांनी सर्व म्हशींच्या कासावर घाव घातले. हे अमानवीय कृत्य करताना त्यांना थोडीही लाज वाटली नाही. या हल्ल्यात बारा म्हशी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत. गावात या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.