भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 08:47 IST2025-09-26T08:47:19+5:302025-09-26T08:47:41+5:30
Crime UP : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण कधी कधी प्रेम माणसाला इतकं स्वार्थी बनवतं की, त्याला रक्ताच्या नात्याचीही किंमत उरत नाही.

AI Generated Image
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण कधी कधी प्रेम माणसाला इतकं स्वार्थी बनवतं की, त्याला रक्ताच्या नात्याचीही किंमत उरत नाही. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यात घडली आहे. इथे एका निर्दयी आईने आपल्या तीन निरागस मुलांना वाऱ्यावर सोडून प्रियकरासोबत पळ काढला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
ढिवकई गावात रामनरेश यादव नावाचा एक कष्टकरी व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मोलमजुरी करून तो आपल्या पत्नी आणि तीन मुलांचा सांभाळ करत होता. घरची सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती.
रामनरेश दिवसभर कामावर बाहेर असताना, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. हळूहळू हे संबंध इतके वाढले की, तिने आपल्या कुटुंबाचा, मुलांचा आणि समाजाचा विचार न करता एक धक्कादायक निर्णय घेतला.
मुलांना सोडून प्रियकरासोबत पळाली!
काही दिवसांपूर्वी रामनरेशची पत्नी घरातून अचानक गायब झाली. जाताना तिने घरातील रोकड आणि दागिनेही सोबत नेले. इतकंच नव्हे, तर तिने आपल्या तीन लहान मुलांनाही घरी एकटं सोडलं. ज्या आईने आपल्या मुलांची काळजी घ्यायला हवी, तीच त्यांना सोडून गेली.
रामनरेश कामावरून घरी आल्यावर त्याला पत्नी घरात नसल्याचे कळले. तेव्हा त्याच्या शेजाऱ्यांनी घडलेला प्रकार त्याला सांगितला. आई सोडून गेल्यामुळे निरागस मुलं घरात रडत होती. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्यांची काळजी घेतली.
पतीची पोलिसांत तक्रार
या घटनेने रामनरेशला मोठा धक्का बसला आहे. पत्नीने विश्वासघात केल्याची भावना त्याच्या मनात आहे. त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्नीने घर सोडून जाण्यापूर्वी मुलांचा विचारही केला नाही, अशी तक्रार त्याने केली आहे.
सध्या मुलांची काळजी रामनरेशचे कुटुंबीय आणि गावकरी घेत आहेत. पण, मुलांच्या डोळ्यात आईपासून दूर राहिल्याचे दुःख स्पष्ट दिसत आहे. या घटनेमुळे ढिवकई गावात संतापाचे वातावरण आहे. एका आईने असं कृत्य कसं काय केलं, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.