माता ना तु वैरिणी....आईनेच दोन मुलांना पाजले दुधातून कीटकनाशक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 22:21 IST2019-03-26T22:19:57+5:302019-03-26T22:21:01+5:30
पतीबरोबर झालेल्या वादातून आईने आपल्या पाच व चार वर्षाच्या दोन मुलांना दुधातून किटकनाशक पाजून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला़...

माता ना तु वैरिणी....आईनेच दोन मुलांना पाजले दुधातून कीटकनाशक
पुणे : पतीबरोबर झालेल्या वादातून आईने आपल्या पाच व चार वर्षाच्या दोन मुलांना दुधातून किटकनाशक पाजून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला़. त्यानंतर तेच दुध स्वत: पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला़ ही धक्कादायक घटना नऱ्हे येथे घडली़.
आई आणि दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सिंहगड रोड पोलिसांनी दिली आहे़.
कविता विश्वास गायकवाड (वय २७), त्यांची मुलगी प्रांजली (वय ५) आणि मुलगा आदित्य (वय ४) अशी त्यांची नावे आहेत़. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जीवन मोहिते यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यालगत असलेल्या नऱ्हे भागात अनंत भुमकर यांच्या शेतात गायकवाड कुटुंबीय राहायला आहे. विश्वास गायकवाड आणि त्यांची पत्नी कविता मजूरी करतात. दोन दिवसांपूर्वी सकाळी स्वयंपाक लवकर केला नाही, या कारणावरुन विश्वास आणि कविता यांच्यात वाद झाला होता.
त्यानंतर सोमवारी सकाळी विश्वास कामावर गेला. पतीबरोबर झालेल्या भांडणाचा राग कविताच्या मनात होता. त्यानंतर कविताने दुधात विषारी औषध मिसळून मुलगी प्रांजली आणि मुलगा आदित्य यांना दिले. कविता यांनी मुलांना दूध दिल्यानंतर स्वत: देखील दूध प्याले. दरम्यान, तिघांना उलट्या सुरु झाल्या. त्यावेळी शेतात असलेल्या रखवालदाराच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने तातडीने या घटनेची माहिती विश्वास यांना दिली. विश्वास घरी आला आणि तिघांना रुग्णालयात दाखल केले. कविता ही शुद्धीवर आल्यावर हा प्रकार उघडकीस आला़ तिघांवर उपचार सुरु असून मुलगा आदित्य याची प्रकृती चिंताजनक आहे. आदित्यला दुसºया एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. पाटील तपास करत आहेत.