MNS graduate candidate Rupali Patil receives death threats in Pune | मनसेच्या पदवीधर उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, पुण्यात खळबळ 

मनसेच्या पदवीधर उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, पुण्यात खळबळ 

ठळक मुद्देराज्यभरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमधून उमेदवार निवडून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पुणे : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आता धमक्या आणि गुंडगिरीचा शिरकाव झाला असून मनसेच्यापुणे पदवीधरच्या उमेदवार रूपाली पाटील यांना सातारा जिल्ह्यातून एका तरुणाने फोन करून 'जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस' अशी धमकी दिल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तपास करून धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.

राज्यभरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमधून उमेदवार निवडून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या निवडणुकीमध्ये रंग भरण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांचा प्रचारही सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन पदवीधरांच्या भेटीगाठी घेणे, प्रचार करणे अशी कामे करीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा रूपाली पाटील या मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केलेला आहे.

शनिवारी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून अज्ञात नंबरवरून फोन आला. 'मी सातारा जिल्ह्यातून लबाडे बोलत असून, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस. अन्यथा पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू.' अशी धमकी दिली. पाटील यांचा फोन त्यांच्या सहकारी महिलेकडे होता. या फोनमुळे ही सहकारी महिला प्रचंड घाबरली. यासंदर्भात रूपाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोनवरून धमकी मिळाली असून मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. यासंदर्भात पुणे पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केल्याचे सांगितले.

फोन करणाऱ्या व्यक्तीस शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे. त्या रविवारपासून पुन्हा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरविण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलीस धमकी देणाऱ्याचा कसा शोध घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. परंतु, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा आता धमक्या आणि गुंडगिरीचे सत्र सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read in English

Web Title: MNS graduate candidate Rupali Patil receives death threats in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.