Missing child's dead body found naked | अर्धनग्न अवस्थेत बेपत्ता मुलाचा आढळला मृतदेह 
अर्धनग्न अवस्थेत बेपत्ता मुलाचा आढळला मृतदेह 

ठळक मुद्दे ७ वर्षीय मुलाचा मृतदेह आज (दि.१२) सकाळी वास्को पोलीसांना शहरातील कोसंबे इमारतीच्या मागच्या भागातील खुल्या जागेतून ताब्यात घेतला.धनू सोळंकी असे त्या मयत मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने त्याच्या मृत्यू मागे घातपात असण्याचा संशय

वास्को - दक्षिण गोव्यातील वास्को शहरात देव दामोदर भजनी सप्ताहाच्या निमित्ताने थाटलेल्या फेरीतून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलाचा मृतदेह आज (दि.१२) सकाळी वास्को पोलीसांना शहरातील कोसंबे इमारतीच्या मागच्या भागातील खुल्या जागेतून ताब्यात घेतला. धनू सोळंकी असे त्या मयत मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने त्याच्या मृत्यू मागे घातपात असण्याचा संशय पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत असून ह्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस यंत्रणे सर्व मार्गाने सध्या तपास करीत आहेत. बेपत्ता झाल्यानंतर ह्या मुलाचा खून करण्यात आलेला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी पोलीसांनी त्याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवलेला असून शवचिकित्सक अहवाल मिळाल्यानंतरच यामागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
वास्कोत दामोदर भजनी सप्ताहाच्या निमित्ताने थाटण्यात आलेल्या फेरीत धनू सोळंकी ह्या सात वर्षीय मुलाच्या कुटूंबाने धातूच्या वस्तू विकणारे दूकान घातले आहे. यामुळे तो आपल्या आईसहीत फेरीच्या काळात दुकानावर यायचा. रविवारी (दि.११) संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धनू दुकानाच्याच जवळ खेळत असताना अचानक तो गायब झाल्याचे त्याच्या आई तसेच मावशीला दिसून येताच त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. सुमारे दोन तास त्याचा शोध घेतल्यानंतर सुद्धा तो सापडला नसल्याने त्याच्या कुटूंबाने याबाबत वास्को पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवली. वास्कोतील फेरीतून सात वर्षीय मुलगा बेपत्ता असल्याचे पोलीसांना समजताच त्यांनी त्या मुलाचा फेरीत तसेच इतर ठिकाणी शोध घेण्यास सुरवात केली, मात्र त्यांना तो सापडला नाही. धनू कुठेच सापडत नसल्याने नंतर फेरीच्या विविध ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही ची फुटेज पोलीसांनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तपासली असता तो त्यांना फेरीतील एका भागात दिसून आला. ज्या ठिकाणी धनू दिसून आला होता तेथे त्याला शोधण्यास पोलीस व कुटूंबातील सदस्य गेले, मात्र तेथे त्यांना तो सापडला नाही. पोलीस तसेच त्याच्या कुटूंबाच्या सदस्यांनी त्याचा शोध घेण्यास चालूच ठेवला. सोमवारी सकाळी शहरातील कचरा साफ करणाऱ्या एका इसमाला वास्कोतील कोसंबे इमारतीच्या मागे एका मुलाचा मृतदेह असल्याचे दिसून येताच त्यांनी त्वरित पोलीसांना माहीती दिली. पोलीसांनी वेळ न दवडता त्वरित घटनास्थळावर धाव घेतली असता हा मृतदेह सात वर्षीय धनू सोळंकी याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार त्या मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. त्या मुलाने घातलेली ‘पेंन्ट’ त्याच्या अंगावर नसल्याची माहीती पोलीसांनी दिली. कोसंबी इमारतीच्या मागे असलेल्या खुल्या जागेतून पोलीसांनी धनू याचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवचिकित्सेसाठी पाठवून दिला आहे. मयत मुलाच्या डोक्याला जखम असल्याचे तपासणीत दिसून आल्याने त्याच्या मृत्यूमागे घातपात (खून) आहे की तो इमारतीत चढल्यानंतर खाली पडून मरण पोचला आहे याबाबत सध्या तपास चालू आहे. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडल्याने ह्या मुलाच्या मृत्यूमागे घातपात (खून) असण्याची दाट शक्यता पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत असली तरी शवचिकित्सक अहवाल पोलीसांना मिळाल्यानंतरच मृत्यूमागचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली.
दरम्यान, सात वर्षीय धनू याचा खून करण्यात आला असावा असा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. सदर मुलगा आपल्या कुटूंबासहीत मंगोरहील, वास्को भागात रहायचा अशी माहीती पोलीसांनी दिली. वास्को पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.  


Web Title: Missing child's dead body found naked
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.