सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज जप्त पाच लाखांची रोकड हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 06:59 IST2021-03-17T02:52:31+5:302021-03-17T06:59:57+5:30
वाझे यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून एनआयएच्या पथकाने मंगळवारी रात्री एका ठिकाणाहून काळ्या रंगाची मर्सिडीज (एमएच १८-बी आर-९०९५) जप्त केली.

सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज जप्त पाच लाखांची रोकड हस्तगत
मुंबई : स्फोटक कार गुन्ह्याचा तपास करताना ‘एनआयए’च्या पथकाने मंगळवारी रात्री एक मर्सिडीज जप्त केली. त्यातून पाच लाखांची रोकड व अन्य वस्तू हस्तगत करण्यात आल्या. सचिन वाझे या गाडीचा वापर करीत होते, अशी माहिती एनआयएचे विशेष महानिरीक्षक अनिल शुक्ला यांनी दिली. ही गाडी जप्त करण्यात आल्याने ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास मदत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाझे यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून एनआयएच्या पथकाने मंगळवारी रात्री एका ठिकाणाहून काळ्या रंगाची मर्सिडीज (एमएच १८-बी आर-९०९५) जप्त केली. त्याच्या डिक्कीमध्ये एका पिशवीत चेक्सचा शर्ट, पाच लाखांची रोकड, नोटा मोजणारे मशीन, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे. ही गाडी वाझे वापरीत होते, त्याचप्रमाणे जी नंबरप्लेट आहे ती स्काॅर्पिओला वापरण्यात आली होती. पीपीई किट वापरणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर असाच लाल रंगाचा चेक्स शर्ट असल्याचे फुटेजमधून स्पष्ट दिसत होते. त्याचबरोबर जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्काॅर्पिओमध्ये जी नंबरप्लेट वापरली होती, ती त्यामध्ये सापडली आहे. या गाडीचा वापर वाझे करीत होते. त्यांनी ती कोठून घेतली, त्याचा वापर ते कशासाठी करीत होते, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे महानिरीक्षक शुक्ला यांनी सांगितले. दरम्यान, ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांनी संशयास्पद मृत्यूपूर्वी याच गाडीतून प्रवास केला होता, असे समजते.
जानेवारीत केली मर्सिडीजची ऑनलाइन विक्री
मर्सिडीजचे मूळ मालक धुळ्यातील सारांश भावसार आहेत. जानेवारीत त्यांनी गाडीची ऑनलाइन विक्री केली होती. ‘कार २४’ या वेबसाईटवरून त्याचा व्यवहार केला होता. त्यामुळे कार विकत घेणाऱ्या दुसऱ्या पार्टीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. तपास यंत्रणेने आपल्याशी संपर्क साधलेला नाही, त्यांनी विचारणा केल्यानंतर आपण सर्व माहिती देऊ, असे भावसारने एका वृत्तवहिनीला सांगितले.